कडूस : पुढारी वृत्तसेवा
सायगाव (ता. खेड) येथिल शेतकरी सुमाकांत पंढरीनाथ काळे यांना फेब्रुवारी महिन्यात कृषि पंपाचे विज बिल तब्बल ३३ लाख ३८ हजार ६९० रुपये एवढे अवाढव्य आले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. राज्यातील सर्वाधिक कृषी पंप थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील गरीब शेतकरी सुमाकांत पंढरीनाथ काळे यांची असल्याचे महावितरणने जाहिर केल्याने त्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.
सुमाकांत काळे यांनी ७ मार्च २०१३ रोजी साडे सात एचपीचे ७ हजार ७०० रुपये भरून नविन विज कनेक्शन घेतले. यानंतर तब्बल दोन वर्षीनी म्हणजेच २०१६ मध्ये सुरूवातीला त्यांना ९९ लाख रुपये विज बिल आले होते. हे बील त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन दाखविले. त्यावेळी महावितरणने हे विज बिल जमा करून घेतले.
या नंतर ऑगस्ट २०१९ काळे यांना १ कोटी १८ लाख ३८ हजार ७९० एवढ्या रकमेचे बिल आले. मात्र २०२२ मध्ये पुन्हा नव्याने बिल येऊन शेतकऱ्यांची कृषि पंपाची वीज पुरवठा खंडित केला. यानंतर त्यांनी २५ हजार रुपये भरले, तेव्हा हा वीज पुरवठा सुरू करण्यात आले; मात्र रक्कम कमी करण्यास महावितरण टाळाटाळ करत असल्याचे नव्या बिलावरून पुढे आले आहे. दरम्यान, आता त्यांना तब्बल ३३ लाख ३८ हजार ६९० रुपये एवढे वीज बील आहे असून सुमाकांत काळे यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.