पुणे

पिंपरी : लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 पथके नियुक्त

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लम्पीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने 3 पथके नेमली आहेत. लसीकरण, उपचार, पशुपालकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यासाठी या पथकांमार्फत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सध्या जनावरांची लसीकरण प्रक्रिया जलद गतीने सुरु आहे. 500 गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

भटक्या गुरांमध्ये लम्पी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली. शहरात गाय व बैल यांच्यामध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने गायींमध्ये या आजाराचा प्रसार होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये लम्पी आजाराची 61 जनावरांना लागण झाली. तीन जनावरांचा मृत्यू झाला. सध्या 15 जनावरांवर उपचार सुरु आहेत.

पथकाला कार्यवाहीच्या सूचना

लम्पी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांचे लसीकरण करणे व बाधित जनावरांना वेळोवेळी उपचाराच्या सुविधा देण्यासाठी पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करुन योग्य रीतीने कामकाज करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पशुवैद्यकीय विभागाला दिल्या आहेत.

गोटपॉक्स लसीचे एक हजार डोस उपलब्ध

शहरातील लम्पी आजाराने बाधित होणार्‍या गुरांची संख्या रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तीन पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, मदतनीस आणि एक पशुधन पर्यवेक्षक असणार आहेत. या पथकांद्वारे महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातंर्गत महत्त्वपूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने राज्य पशुसंवर्धन विभागाकडून गोटपॉक्स लसीचे 1000 डोस उपलब्ध करून घेतले आहे. तसेच, आणखी डोस देण्याची मागणी केली आहे.

पथकासोबत खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर

पशुवैद्यकीय विभागाने खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना लम्पी आजाराबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर झाल्यानंतर वेळेत उपचार सुरु करण्यात येतील. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तिन्ही पथकांसोबत खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर देखील देण्यात आले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT