Admission Pudhari
पुणे

11th Admission Maharashtra 2026: अकरावी प्रवेशाला सुरुवात; शून्य फेरी 8 मेपासून, पहिली फेरी 21 ते 28 मे

7.7 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण; ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती, वर्ग 1 जुलैपासून सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, अकरावी प्रवेशाच्या शून्य तसेच पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 8 मे ते 20 मेदरम्यान शून्य फेरी, तर 21 मे 28 मेदरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून, आतापर्यंत 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थी येत्या 11 मेपासून प्रवेश अर्जातील पहिला व दुसरा भाग भरू शकतात. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन डॉ. पालकर यांनी केले आहे.

शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशाची शून्य फेरी 8 मेपासून सुरू झाली असून, विद्यार्थी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरू शकतात. 11 मे ते 13 मे या कालावधीत विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग व दुसरा भाग तसेच व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इन-हाऊस खोट्या संदर्भातील माहिती भरू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी किमान एक आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्याने नोंदणी करावी. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 14 ते 15 मेदरम्यान प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर 16 मे रोजी विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येतील. 20 मे रोजी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली असून, यंदा 2026-27 चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी वेगाने सुरू असून, अकरावीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया दर वर्षी रेंगाळत असून, या प्रक्रियेत 10 फेऱ्यांपेक्षा अधिक फेऱ्या होतात. त्याचप्रमाणे दिवाळीनंतरही प्रवेशप्रक्रिया सुरू राहत असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सिंह यांनी सांगितले, की दर वर्षी सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकर पूर्ण होतात. मात्र, काही विद्यार्थ्यांना पहिल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने संपूर्ण प्रक्रिया रेंगाळते. ग््राामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रवेश फेऱ्या राबवाव्या लागतात आणि त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर होतो. यंदा निकाल लवकर जाहीर झाला असून, ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ग वेळेत सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेशही पुढील फेऱ्यांद्वारे तातडीने पूर्ण केले जातील, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया लवकरच

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी साधारण 1 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाइटवर भेट द्यावी.

पहिली फेरी

शून्य फेरी संपल्यानंतर 21 ते 28 मेदरम्यान नियमित पहिली फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 21 मे सकाळी 8 ते 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भाग एक भरणे, अर्जाचा भाग दोन भरणे ही प्रक्रिया करता येणार आहे. 23 ते 26 मेदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. 26 ते 28 मेदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे. 29 मे रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येतील. तसेच 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया लवकरच

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून दीड ते दोन लाखांहून अधिक जागा उपलब्ध होत्या. आयटीआय प्रवेशाकडे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. ज्या विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशाला प्राधान्य देण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर भेट द्यावी.

आतापर्यंत पावणेआठ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी, प्राधान्यक्रम निवड व कागदपत्रे अपलोड ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटहून नोंदणी करायची आहे. या वेबसाइटवर आता 9 हजार 594 ज्युनिअर कॉलेजांची नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे 7 लाख 77 हजार 233 विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत भाग 1 भरला आहे. आता भाग 2 म्हणजेच प्रवेशासाठी कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल. विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT