

भामा आसखेड: पुणे जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भामा-आसखेड धरणातून पाणी सोडल्याने तालुक्यातील सिद्धेगव्हाणपर्यंतचे बंधारे पाण्याने भरले आहेत. सोडलेल्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना होत असून, सध्या भामा आसखेड धरणामध्ये 47.47 टक्के दिलासादायक पाणीसाठा शिल्लक आहे.
खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांना शेतीसाठी, तसेच अनेक गावांना पिण्याचे पाणी या धरणातून पुरवले जाते. याशिवाय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही भागालाही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे 8.14 टीएमसी क्षमतेचे भामा आसखेड धरण या चार तालुक्यांसाठी हरितक्रांतीचे वरदान ठरले आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणापासून सिद्धेगव्हाणपर्यंतचे बंधारे भरण्यासाठी तीन दिवस पाणी सोडले होते.
या पाण्याचा प्रमुख फायदा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी होत आहे. शेतकऱ्यांनी मागणी करताच अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत भामा आसखेड धरणातील पाणीसाठा अधिक असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक असताना धरणातील उपलब्ध पाणीसाठा दिलासादायक मानला जात आहे.
दि. 29 एप्रिल ते 1 मेदरम्यान धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सिद्धेगव्हाणपर्यंत भीमा व भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरले आहेत. लवकरच तिसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असून, कालवा समितीच्या नियोजनानुसार दौंड तालुक्यातील आलेगावपागापर्यंतचे एकूण 18 बंधारे पाण्याने भरले जाणार आहेत. या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांनाही होणार आहे.
धरणातील पाणीसाठ्याची सध्याची आकडेवारी
भामा आसखेड धरणाची एकूण क्षमता 8.14 टीएमसी असून, सध्या धरणात 4.11 टीएमसी म्हणजेच 47.47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील पाण्याची पातळी 662.63 दलघमी असून, एकूण पाणीसाठा 116.581 दलघमी आहे. तर, उपयुक्त पाणीसाठा 103.059 दलघमी इतका आहे.