Marathi Sahitya Sammelan Pudhari
पुणे

100th Marathi Sahitya Sammelan: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी; देशभर होणार ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने

पुणे विद्यापीठात नियोजन कार्यशाळा; महाराष्ट्रासह देशभरातील साहित्य शाखांचा सहभाग, १४ ऑगस्टपासून संमेलनांना सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त देशभरात ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. या संमेलनांचे नियोजन आणि आराखडा निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संलग्न शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि कार्यशाळा रविवारी (दि. २६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी साहित्य संमेलने झालेल्या ठिकाणी ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील शहरांचाही त्यात समावेश असेल.

त्यानिमित्ताने आयोजित कार्यशाळेत साहित्य परिषदेशी संबंधित राज्यातील साधारण १७० निमंत्रित व्यक्ती सहभागी होणार आहेत. देशभर होणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांचे वेळापत्रक, स्थळे आणि कार्यक्रमांची माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे. येत्या १४ ऑगस्ट ते १५ जानेवारी या काळात ही संमलने होतील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.

तर, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जगभरातील प्रत्येक मराठीभाषकापर्यंत पोहचावे, हा आमचा मानस आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील साहित्य मुख्य प्रवाहात आणून शंभराव्या संमेलनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे, असे साहित्य संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT