Wada Paddy Procurement Pudhari
पालघर

Wada Paddy Procurement: वाड्यातील भात खरेदी केंद्रांवर खडखडाट; अती पावसामुळे उत्पादन निम्म्यावर

१४ हजार हेक्टरवरील भातशेतीला फटका; मानिवली केंद्रावर खरेदीत मोठी घट, शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात असून येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय देखील आहे. मागील वर्षी पावसाने तालुक्याला चांगलेच धुतल्याने भात शेतीचा पार बट्ट्याबोळ झाला असून शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सरकार दरबारी जरी किरकोळ नोंद असली तरी घटलेल्या उत्पन्नावरून यावर्षी निम्मेने शेती पिछाडीवर गेल्याचे शेतकरी सांगतात. भात खरेदी केंद्रांवर दरवर्षी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत मात्र यावर्षी खडखडाट बघायला मिळत आहे.

वाडा तालुक्यात बहुतांश शेतकरी भातशेतीवर अवलंबून असून मोठ्या क्षेत्रावर पिकणारा वाड्याचा तांदूळ जगात प्रसिद्ध आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून भाताची खरेदी केली जात असून यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळून मोठा आधार मिळत आहे. मागील पावसाळ्यात मात्र पावसाने हाहाकार माजवला असून जवळपास 5 महिने कोसळणाऱ्या पावसामुळे भातशेतीची वाताहत झाल्याचे शेतकरी सांगतात. 15 जानेवारीपासून भात खरेदीला सुरुवात झाली असून मानिवली भात खरेदी केंद्रावर 202 शेतकऱ्यांनी आतापर्यंत भाताची विक्री केली आहे.

साडेतीन हजार क्विंटल भाताची खरेदी या केंद्रावर आतापर्यंत झाली असून ही खरेदी अतिशय किरकोळ असल्याचे रिकाम्या गोदामावरून लक्षात येत आहे. मागील वर्षी 650 शेतकऱ्यांकडून जवळपास 15 हजार 900 क्विंटल भाताची खरेदी झाली होती मात्र यावर्षी हीच खरेदी निम्मेवर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी पावसाची संततधार सुरूच असल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले, याचाच हा परिणाम असल्याचे शेतकरी सांगतात.

पीक गावातील शेतकरी नारायण पाटील यांना विचारणा केली असता मागीलवर्षी 130 गोणी भात विक्री केले मात्र यावर्षी केवळ 80 गोण्या उत्पन्न झाले आहे. 1 लाखांचा खर्च शेतीला झाला मात्र उत्पन्नात 1 लाखाची घट येऊन नुकसान भरपाई मात्र 5 हजार आल्याचा मेसेज आला आहे. पावसामुळे भातशेती संकटात आहेच मात्र कडधान्य देखील अडचणीत सापडल्याने वर्षभरात मोठे नुकसान सोसावे लागल्याचे पाटील सांगतात. भातशेती विविध अडचणींमुळे एकीकडे शेतकऱ्यांना नकोशी झाली असताना उत्पन्नात मोठी घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

केंद्रावर यावर्षी कोणतेही मजूर उपलब्ध नसून वारंवार व्यवस्था करण्याचे ठरवूनही मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे भात स्वतःच उतरवून ठेवण्याखेरीज पर्याय नसून तुलनेत यावर्षी भाताचे उत्पन्न अतिशय तिकडे वाटत आहे.
विलास वाणी, केंद्र प्रमुख, मानिवली केंद्र.
वाडा नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यात यावर्षी भाताचे उत्पन्न निम्मेंवर आले असून खरेदी केंद्रावर होणाऱ्या भाताच्या विक्रीतून ते लक्षात येत आहे. हमाल जरी नसले तरी शेतकऱ्याला हमालीचे पैसे देण्याची तरतूद असून केंद्र प्रमुखांना तशी रक्कम जमा देखील करण्यात आली आहे.
राजेश पवार, उप प्रादेशिक व्यवस्थापक, मोखाडा

शेतकरी बनले हमाल

भात खरेदी केंद्रावर शेतकरी ट्रॅक्टर, ट्रक, मालवाहू जीप अशा विविध वाहनातून भाताच्या गोण्या घेऊन येत असतात. वजन करून गोण्या गोदामात लावण्यासाठी दरवर्षी सरकारकडून मजूर उपलब्ध असतात. भात खरेदी केंद्रावर यावर्षी मात्र मजूर नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्वतः खांद्यावर घेऊन उतरवावा लागत असून अनेकदा खाजगी मजूर लावून मोठी पदरमोड करावी लागत आहे. एकीकडे उत्पन्नात घट तर दुसरीकडे आर्थिक व शारीरिक पिळवणूक यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT