

बोईसर : देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील तारापूर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक -82/ येथील ‘श्री विनायक केमेक्स’ या रासायनिक कारखान्यात क्लोरिन वायूची गळती झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे काही काळ औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक क्लोरिन गॅसची गळती सुरू झाली. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरल्याने काही कामगारांना श्वसनास त्रास, घशात जळजळ तसेच अस्वस्थता जाणवू लागली. प्रकार लक्षात येताच कारखाना व्यवस्थापनाने तातडीने अग्निशमन दल व संबंधित यंत्रणांना कळविले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बीए सेट चा वापर करून गळतीचा स्रोत शोधण्यात आला. संरक्षणात्मक उपकरणांच्या सहाय्याने सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वायू गळती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.दरम्यान, घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) चे अधिकारी तसेच डिश (औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय) चे श्रीनिवास यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित विभागाकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू असून सुरक्षा उपाययोजनांबाबत कारखाना व्यवस्थापनाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.याबाबत ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. तसेच रासायनिक कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या मानकांचे काटेकोर पालन होत आहे का, याबाबत प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.