विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांवर उपाय म्हणून तालुका निर्मितीनुसार 26 जानेवारी 2009 रोजी महावितरणचे उपविभागीय कार्यालय (उपकार्यकारी अभियंता) सुरू करण्यात आले. मात्र, या कार्यालयात आजही अत्यंत अपुरा कर्मचारी वर्ग आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तब्बल 20 ते 25 हजार वीज ग्राहकांना अवघ्या 13 कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सेवा दिली जात आहे. त्यामुळे हे कार्यालय केवळ नावापुरतेच असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून केला जात आहे.
लाईन, 380 कि.मी. एस.टी. लाईन व 40 कि.मी. 33 के.व्ही. लाईन आहे. विक्रमगड तालुका दुर्गम व जंगलपट्ट्यातील असल्याने पावसाळ्यात लाईन ब्रेकडाऊन, ट्रान्सफॉर्मर बिघाड व वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र मर्यादित कर्मचारी संख्येमुळे दुरुस्ती व तक्रार निवारणासाठी मोठा विलंब होत आहे. महावितरणच्या विक्रमगड शाखेअंतर्गत असलेल्या हजारो ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत असून, विशेषतः पावसाळ्यात तीन फिडरपैकी लाईन बंद झाल्यास दुरुस्ती करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिणामी ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. सध्या कार्यान्वित असलेले उपविभागीय कार्यालयही अपुऱ्या जागेत व मर्यादित मनुष्यबळावर चालत असून, संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठ्याचा भार या मोजक्या कर्मचाऱ्यांवरच आहे. त्यामुळे तक्रारी वाढत असून ग्राहकसेवा विस्कळीत होत आहे.
विक्रमगड तालुका झाल्यानंतर उपसहायक अभियंता कार्यालय सुरू झाले असले, तरी पूर्वीच्या जुन्या सहाय्यक अभियंता कार्यालयावरीलच भार कायम आहे. त्यामुळे नव्याने किमान तीन सेक्शन सहायक अभियंता कार्यालये सुरू होणे अत्यावश्यक आहे.नितीन वाडेकर, जिल्हा प्रमुख, आध्यात्मिक सेना.
विक्रमगड हा नवनिर्मित ग्रामीण व आदिवासी तालुका असून त्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. तालुक्यात सुमारे 140 कि.मी. उच्चदाब व 440 कि.मी. लघुदाब विद्युत वाहिन्या आहेत. सध्या केवळ एकच शाखा कार्यालय असल्याने लाईन ब्रेकडाऊन, नवीन वीज जोडणी, नादुरुस्त मीटर बदल, देखभाल-दुरुस्ती तसेच वीजचोरीवर नियंत्रण ठेवणे ही कामे प्रभावीपणे होऊ शकत नाहीत. त्यामुळे आणखी तीन सेक्शन सहायक अभियंता कार्यालये तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.