Vikramgad Desi Rose Farming Pudhari
पालघर

Vikramgad Desi Rose Farming: विक्रमगडमध्ये गावठी गुलाबाची सुगंधी क्रांती; तरुण शेतकरी शिवम मेहता यांची यशोगाथा

800 पेक्षा अधिक गुलाब झाडांची लागवड; थेट दादर फुल मार्केटमध्ये विक्री करून दररोजचा स्थिर नफा

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड : फुलांचा राजा अशी ओळख असलेल्या गुलाब लागवडीत नवनवे तसेच अत्याधुनिक प्रयोग होत असल्यामुळे गुलाब शेतीला चांगला प्रतािद मिळत आहे.

विक्रमगड तालुक्यातील वाकडूपाडा येथील तरुण शेतकरी शिवम मेहता यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक बाजारपेठेची जोड देत गावठी (देशी) गुलाब लागवडीतून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नैसर्गिक सुगंध, दर्जेदार उत्पादन आणि थेट बाजारपेठेतील विक्री यामुळे त्यांच्या गुलाब शेतीला चांगला प्रतिसाद मिळत असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. शिवम मेहता यांनी आपल्या शेतात सुमारे 800 ते 900 गावठी गुलाबाची झाडे लावली आहेत. या गुलाबाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दरवळणारा नैसर्गिक आणि टिकाऊ सुगंध.

हायब्रिड फुलांच्या तुलनेत गावठी गुलाबाचा सुगंध अधिक गडद व दीर्घकाळ टिकणारा असल्याने बाजारात त्याला विशेष मागणी असते. सध्या त्यांच्या शेतातून दररोज सरासरी 6 ते 7 किलो गुलाबाची तोड होते. सर्वसाधारण दिवसांत गुलाबाला प्रति किलो 200 ते 250 रुपये दर मिळतो. मात्र सण-वार, लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात हा दर 300 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढतो. योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास गुलाब शेतीतून चांगला नफा मिळू शकतो, असे मेहता सांगतात.

शिवम मेहता यांचा गुलाब प्रामुख्याने दादर फुल मार्केट येथे विक्रीसाठी पाठवला जातो. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत गावठी गुलाबाला सातत्याने मागणी असल्याने विक्रीत अडचण येत नाही. व्यापाऱ्यांकडून थेट खरेदी होत असल्याने योग्य दर मिळण्यास मदत होते. गावठी गुलाबाचा उपयोग गुलाबजल, गुलकंद निर्मितीसाठी तसेच देवपूजा, मंदिर सजावट व डेकोरेशनसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय गुलाबाच्या सुक्या पाकळ्यांचा वापर मिठाई, स्वीट्स आणि विविध खाद्यपदार्थांमध्येही केला जातो. नैसर्गिक सुगंध व चव यामुळे ग्राहकांकडून या गुलाबाला अधिक पसंती मिळते.

विक्रमगड तालुक्यातील तरुण शेतकरी नव्या प्रयोगांकडे वळत असून गावठी गुलाब लागवड ही त्यातील एक यशस्वी दिशा ठरत आहे. सुगंधाने दरवळणाऱ्या या गुलाबामुळे तालुक्याची ओळख आता बाजारपेठेत वेगळी निर्माण होत आहे.

सेंद्रिय पद्धतीचा अवलंब

शिवम मेहता यांनी रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय पद्धतीवर भर दिला आहे. नियमित छाटणी, योग्य पाणी व्यवस्थापन आणि प्रभावी कीडनियंत्रण यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेता येते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

तरुणांसाठी प्रेरणादायी दिशा

परंपरागत पिकांबरोबरच फुलशेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. बाजारपेठेचा अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत आणि दर्जेदार उत्पादन या त्रिसूत्रीवर भर दिल्यास गावठी गुलाब लागवड फायदेशीर ठरते, असे मत शिवम मेहता यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT