पालघर शहर : वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्थानिक मच्छीमार, भूमिपुत्रांनी वाढवण बंदराविरोधात एल्गार पुकारत धडक मोर्चा काढला. पालघर शहरातील हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्रित काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने स्थानिक मच्छीमार, भूमिपुत्र शेतकरी आदिवासी बांधव, महिला, तरुण-तरुणी सहभागी झाले. यावेळी सरकार प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तब्बल पालघर शहर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 600 पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि एसआरपीएफच्या दोन तुकड्या असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
वाढवण येथे केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. समुद्रात 1,448 हेक्टर क्षेत्रामध्ये भराव टाकून विशालकाय बंदर विकसित केले जाणार आहे. मात्र वाढवण बंदरामुळे स्थानिक भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी बांधवांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार असून बंदर उभारणीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे.
डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने डहाणू हा इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने येथे वाढवण बंदर उभारणे पर्यावरणास घातक ठरेल, असे नमूद केले होते. केवळ प्रकल्पांची श्रेणी बदलून जुन्या बंदीचा आदेश डावलणे हे बेकायदेशीर असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. यामुळे हजारो कुटुंबांचा पारंपारिक मासेमारी व इतर व्यवसाय उपजीविकेचे साधन नष्ट होईल. किनारपट्टी आणि नैसर्गिक संसाधने ही सरकारची खाजगी मालमत्ता नसून जनतेची संपत्ती आहे. केवळ त्याचे विश्वस्त सरकार असून बंदर उभारणीसाठी समुद्रबुजवून निसर्ग समतोल बिघडेल. सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनात त्रुटी असून जनसुनावणीत हरकतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाढवण बंदर त्याचप्रमाणे मुरबे बंदर, टेक्स्टाईल पार्क, समुद्रात उभारण्यात येणारे विमानतळ आदींसह जिल्ह्यात राबविण्यात येणारे विनाशकार प्रकल्प रद्द करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या आंदोलनात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, कष्टकरी संघटना, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, लोक प्रहार संघटना आदिम सह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी झाले.