संदीप जाधव
बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत येणाऱ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सत्तर बंगला परिसरातील एस-झोनमध्ये पहाटेच्या सुमारास वायर बंडलने भरलेला एक ट्रेलर उघड्या गटारात घसरून अपघातग्रस्त झाला. या दुर्घटनेत वाहनासह कंपनीच्या संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेपाच वाजता ट्रेलर वळण घेत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारात त्याचा टायर घसरला. नियंत्रण सुटल्याने ट्रेलर समोरील कंपनीच्या भिंतीवर आदळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे आणि भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेनंतर परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांना तसेच उद्योगांकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सत्तरच्या दशकात विकसित झालेली तारापूर एमआयडीसी देशभरात परिचित औद्योगिक वसाहत आहे. तरीही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, उघडी गटारे आणि अपुरी देखभाल यामुळे वाहनचालक व उद्योजकांना वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी कायम आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून उघडी गटारे सुरक्षित करावीत तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी उद्योग व कामगारांकडून करण्यात येत आहे.