Nitesh Rane Kokan Bhavan: मिरा-भाईंदरमधील ‘टीपू सुलतान’ चौक उखडणार; मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार - मंत्री नितेश राणे
ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील पाच वर्षांत ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी करत यासाठी मुख्यमंत्र्यांशी व आयुक्तांशी चर्चा करू, असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाण्यात केले.
ठाण्यातील शिवाई नगर येथील मालवणी महोत्सवात ना. राणे बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजयुमोचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्व. अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृती, शेतीउत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. मंत्री नितेश राणे म्हणाले, “वडील खासदार नारायण राणे यांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यातील महोत्सवाला आलो आहे. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे. आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा. मी स्वतःही मुख्यमंत्र्यांशी तसेच ठामपा आयुक्तांशी बोलेन.” ही केवळ मागणी नाही तर हक्क आहे. असे स्पष्ट करून
ना. राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेतीउत्पादनांना शहरांत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कोकणी आवाज पोहोचवण्यात सर्वांनी आग्रही राहण्याचे आवाहन केले. “मुंबईपासून तळ कोकणापर्यंत चिपळूण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत. कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तेव्हा, कोकणी माणसाने स्वप्न बघावे. त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही शासन म्हणून कटीबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या मालवणी महोत्सव भेटीच्या अनेक आठवणी जागवत महोत्सवाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यटकांमध्ये युवकांना संधी
मत्स्योद्योग व सागरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी युवकांना संदेश देताना मंत्री नितेश राणे यांनी, कोकणचा 877 कि. मी.चा किनारा आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच युवकांनी मत्स्योद्योग, सागरी अर्थकारण आणि बंदरविकास क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
मिरा-भाईंदरमधील ‘टीपू सुलतान’ चौक उखडणार
मिरा-भाईंदरसह अन्य शहरांत ‘टीपू सुलतान’ नावाने ओळखले जाणारे चौक असल्याचे मंत्री नितेश राणे यांना विचारले असता, त्यांनी आपली जहाल भूमिका स्पष्ट केली. असे कुठे चौक असतील तर त्याला उपटून बाजूला टाकू, असे राणे म्हणाले.

