

डोंबिवली : रूग्णांचा रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी बाजारात छुप्या मार्गाने बनावट टेल्मा ओएमबीपीच्या टॅब्लेट्सचे वितरण करणाऱ्या बदमाशांचा मनसुबा डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने उधळून लावला आहे. श्रीराम फार्मा नावाने असलेल्या औषध विक्री परवान्याचा वापर करून मानवी प्रकृतीस धोकादायक असलेल्या बनावट टॅब्लेट्स औषधांच्या बाजारात आणणाऱ्या दोघा बदमाशांकडून पोलिसांनी आतापर्यंत 8 लाख 94 हजार 400 रूपये किंमतीच्या 2 हजार 795 स्ट्रिप्स हस्तगत केल्या आहेत.
रक्तदाबाच्या रूग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची कुणकुण रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह पोलिसांना लागली होती. नामांकित कंपनीच्या नावाने बनावट औषधाचे वितरण आणि विक्री करणारे या मागे मोठे रॅकेट असावे, असा पोलिसांचा कयास होता. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या पार्श्वभूमीवर औषध माफियांच्या कारनाम्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या जाळ्यात डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय (33,) आणि मुंबईतील वितरक विवेक अजयकुमार राय (35) हे दोघे अडकले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश राळेभात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघांकडून टप्प्याटप्याने तब्बल 8 लाख 94 हजार रूपये किंमतीचा औषधांचा साठा हस्तगत केला आहे. रूग्णाच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या नामांकित कंपनीच्या टॅब्लेट्स औषधाच्या बनावट गोळ्यांची वितरण व विक्री औषधांच्या बाजारात सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे हा बनावट औषधांचा साठा बिहार राज्यातून आल्याने चौकशीदरम्यान उघडकीस आले. बनावट औषधांचे बिहार कनेक्शन तपासात समोर आले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. यामध्ये डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील विवेक राय या दोघांचा समावेश आहे.
कल्याण कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार पोलिसांच्या कोठडीत असलेला औषध विकेता पंकज उपाध्याय हा सदर औषधांचे विक्री आणि वितरण करत होता. बनावट औषध असल्याने ते मानवी शरीरास अपायकारक असल्याचे, तसेच त्याच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास धोका पोहचू शकतो हे माहित असताना सुध्दा सदर औषध मूळ उत्पादकाचे असल्यासारखे दर्शवून त्याचे श्रीराम फार्मा या औषध परवान्यामार्फत विक्री करत होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन पथकाने छापा टाकून त्याच्याकडून 8 लाख 94 हजार 400 रूपये किंमतीच्या एकूण 2 हजार 795 स्ट्रिप्स जप्त केल्या.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेला य बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रूग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका होतो. या गंभीर प्रकरणाच्या तपासावर डीसीपी अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे, वपोनि संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश राळेभात आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने लक्ष केंद्रित केले आहे.