पालघर जिल्ह्यातील सातपाटी बंदरावर उतरणारी ताजीतवानी मासोळी जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मासळीला महत्वाचे स्थान दिले जाते. कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये मासे हे प्रमुख आहार व अन्न आहे. बोंबिल, मांदेली, कोलंबी, खेकडे, हलवा, पापलेट, सरंगा, दाढा, घोळ, सुरमई, वाव आदी मासे तर तोंडाची चव भागवतात. पालघर तालुक्यातील सातपाटी हे गाव अशा माशांसाठी जगप्रसिद्ध आहे. या गावातून पारंपरिक मासेमारीद्वारे पकडले जाणारे पापलेट जगप्रसिद्ध असून संपूर्ण जगात या पापलेटचा बोलबाला आहे.
जयवंत हाबळे
कुलाबापासून ते उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीचे महत्व असलेले सातपाटी हे एक प्रमुख गाव आहे. मत्स्य परंपरा लाभलेल्या समुद्रासमोर वसलेले आहे 100% मच्छीमार वस्ती असलेले सातपाटी हे गाव मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे.
या भागांतील मच्छीमारांकडून डालदा पद्धतीने पापलेटची मासेमारी केली जाते. ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान पापलेटची आवक अधिक प्रमाणात असते. पश्चिम किनारपट्टीवर मिळणाऱ्या पापलेटपैकी अधिक तर पापलेटची सातपाटी भागातील मच्छीमार मासेमारी करीत असून येथील अधिक तर पापलेट निर्यात होत असते.
सातपाटी येथील सहकारी मच्छीमार संस्थांच्या माध्यमातून निर्यातदारांसाठी पापलेटचे घाऊक खरेदी दर निश्चित केले जातात व त्या अनुषंगाने नायगाव, वसई व इतर भागांतील पापलेटचे दर सातपाटीच्या दरांच्या अनुषंगाने निश्चित होत असतात. मुंबई येथून मासाची निर्यात कमी प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून सातपाटीच्या मच्छीमार संस्था गुजरात राज्यातील वेरावळ पोरबंदर भागातील निर्यातदारांमार्फत पापलेटची निर्यात करतात. गुजरातमधून होणाऱ्या 3700 कोटी रुपयांच्या मासे निर्यातीपैकी 2500 कोटी रुपयांचे मासे चीनमध्ये निर्यात केले जातात.
भारतीय अर्थव्यवस्थेत पापलेट पासून मिळणाऱ्या परकीय चलनाचा मोठा वाटा या गावाचा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही सातपाटीचे पापलेट सुप्रसिद्ध आहेत.
विशिष्ट पद्धतीने मासेमारी करून हे पापलेट पारंपरिक पद्धतीने पकडले जात असल्याने या पापलेटची चव आजही कायम आहे. सातपाटी हे गाव पापलेटसाठी जगप्रसिद्ध असल्याने या गावातून जगभरात पापलेटची निर्यात केली जाते.
या गावात पापलेटची मासेमारी विशिष्ट पद्धतीने अर्थात व दादा पद्धतीने केल्याने चविष्ट पापलेट व सुस्थितीत हाताळलेले खडक पापलेट ठराविक अशा जाळ्याला लागतात. या जाळ्यांमधून केलेली पापलेटची मासेमारी ही त्याच पद्धतीच्या जाळ्यांनी वापरले जात असल्याने या जाळ्यांमध्ये ठराविक मापाचे पापलेट पडतात. याउलट पापलेटची लहान पिल्ले जाळ्याचेे व्यास मोठे असल्याने त्यातून बाहेर पडतात त्यामुळे पापलेटचे उत्पादनही कायम राहते.
हे पापलेट मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केले जातात. दरवर्षी सातपाटीच्या मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये पापलेटचा दर घोषित केला जातो. हा दर हे खासगी व्यापारी घोषित करतात. त्यानंतर त्याच भावाने हे पापलेट वर्षभर घेतले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पापलेट मत्स्य व्यवसायाने परकीय चलन मिळण्याचे प्रमाण मोठे आहे.
चीन यासह अमेरिका, ब्रिटन, इंग्लंड आदी देशांमध्ये पापलेटचा मोठा खप आहे. भारतातून हे पापलेट प्रक्रिया करून सीलबंद डब्यात परदेशात पाठवले जातात. असे असले तरी डब्यांवर सातपाटी हे नाव कायम असते. त्यामुळे या पापलेटचा बोलबाला जगभर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
भारतीय अर्थव्यवस्थेत पापलेटची निर्यात ही महत्त्वाची असल्याने या पापलेटची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना उभारी देण्याची आवश्यकता आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला अजून बळकटी मिळेल. मच्छीमारांना पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करताना विविध साधने मत्स्यव्यवसाय विभागाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पापलेटसाठी विशिष्ट मानांकन देऊन त्याचे जगभर ब्रँडिंग करणे खूपच महत्वाचे आहे. त्यामुळे पापलेट सारख्या जगप्रसिद्ध माशांना आणखी चालना मिळेल व सातपाटी जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा उभारी येईल.
वडराई, सातपाटी, एडवण, कोरे, उसरणी, मुरबे, खारेकुरण, नवापूर, उच्छेली-दांडी, घिवली, धाकटी डहाणू, मोठी डहाणू, नरपड, झाई-बोर्डी, वसई, उत्तन, अर्नाळा, नायगाव, खोचिवडे इत्यादी जिल्ह्यांतील किनारपट्टीवरील सुमारे तीन हजार लहान-मोठ्या नौकांद्वारे इथे मासेमारी केली जाते.
काही भांडवलदार ट्रॉलर्सवाल्यांनी 10 एप्रिल 2007 रोजी केंद सरकारच्या कृषी, पशु व मत्स्यव्यवसाय खात्याच्या उपसचिवांकडून ‘एक्सक्ल्युसिव्ह इकॉनॉमी झोन’ या समुद्री क्षेत्रात 12 नॉटिकलच्या पुढे मासेमारी करण्यासाठी परवानगी मिळवली. मासेमारीसाठी सुवर्णपट्टा मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू, तलासरी येथे, तसेच खंबातच्या आखातात गुजरात आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो ट्रॉलर्सनी शिरकाव करून मागील हंगामातील एप्रिल व मे महिन्यात अंडीधारी मासे व पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी केल्याने मासेमारीत प्रचंड घट झाली.
श्जगात सर्वात जास्त मागणी असलेला पापलेट हा मासा असून सातपाटी येथे 1990 च्या काळात या माशाचे एक हजार टन उत्पादन होत असे. त्याचे प्रमाण गेल्या पाच-सहा वर्षांत 350 टनांपर्यंत घसरले आहे.
चालू हंगामात तर तो दोन्ही मत्स्यसंस्थांच्या दरबारी केवळ 162 टन उत्पादनापर्यंत खाली आला. त्यामुळे मासेमारीत अग्रेसर असलेल्या सातपाटीतीलच नव्हे, तर ठाणे जिल्ह्याच्या या किनाऱ्यावरील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ ओढवेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
दाढा व घोळ यासारखा दिसणारा कोत हा मासा 2005 मध्ये 25 टन इतका मिळाला होता. चालू हंगामात तर जेमतेम साडेतीन टनच मासा मिळाला आहे.