

डहाणू :डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे अवैध खाजगी सावकारांच्या अमानुष जाचाला कंटाळून एका डायमेकर व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अवैध खाजगी सावकारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी पाच खासगी सावकारांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिंचणी येथील रहिवासी किशोर दवणे हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह डायमेकिंग काम करून करत होते. व्यवसायासाठी त्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जावर अवाजवी व्याज आकारले जात असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. कर्ज फेडीसाठी सातत्याने होणारा मानसिक छळ, धमक्या आणि पैशासाठीचा वाढता दबाव यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासा दरम्यान एकूण पाच खाजगी सावकार आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी मंगेश चुरी (रा. चिंचणी) आणि तुषार साळसकर (रा. चिंचणी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता, 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.दरम्यान, उर्वरित आरोपींची चौकशी सुरू असून, तपासाअंती त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी सांगितले.
खाजगी सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर मृतकाचे नातेवाईक तसेच नागरिकांमध्य ्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यांवर प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम घालावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
डहाणू, चिंचणी व आसपासच्या भागात अवैध खाजगी सावकारीचा सुळसुळाट वाढत असून, अशा घटनांमुळे कर्जदार नागरिकांचे जीवन धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस कारवाई करावी, अशी मागणी या घटनेनंतर पुन्हा एकदा पुढे आली आहे.