

पालघरः नाताळची सुट्टी तसेच जोडून आलेल्या सुटयामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन ठिकाण फुलली आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतसाठी जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. अनेक रिसोर्ट, हॉटेल्सवर आगाऊ बुकींग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील केळवेसह अन्य समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. एकूणच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह समुद्रकिनारे सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
31 डिसेंबरच्या दिवशी एकादशी येत असल्यामुळे व त्यापाठोपाठ गुरुवार असल्यामुळे अनेक बांधवांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन या महिन्याच्या शेवटच्या शनिवार रविवारी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन साजरा करण्याचे बेत आखले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केळवे येथील हॉटेल व्यावसायिकांनी खास तयारी केली आहे. बऱ्याच पर्यटकांनी 31 डिसेंबरचा सूर्यास्त आणि नवीन वर्षाचा सूर्योदय समुद्रकिनारी पाहण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आणखी दोन दिवसात गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांनी पालघरकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता मनोर ते वसई-घोडबंदर आणि चारोटी-तलासरी दरम्यानच्या रस्त्याची कामे काही अंशी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर आला आहे. रस्ते सुखकर झाल्याने पर्यटकांनी पुन्हा एकदा केळवे, डहाणू येथील निसर्गरम्य किनाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.