

पालघर ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि ट्रेलरचालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आणि शुक्रवारी पहाटे सातिवली गावाच्या हद्दीत अपघात झाले होते.या . अपघातांसाठी कारणीभूत टेम्पो आणि ट्रक चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाच्या हद्दीत नादुरुस्त अवस्थेत उभ्या ट्रकला भरधाव वेगातील ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक धर्मेंद्र महतो (32) याच जागीच मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यातील जामनगर येथून लाकडी फळ्या भरलेला ट्रेलर मुंबईच्या दिशेने जात होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ट्रेलर सातिवली गावाच्या हद्दीत पोहोचला असता मुंबई वाहिनीच्या पहिल्या मार्गीकेत नादुरुस्त अवस्थेत उभ्या ट्रकला धडक दिली.
अपघातात ट्रेलरच्या चालक केबिनचा चक्काचूर झाला होता.गंभीर अवस्थेत केबिन मध्ये अडकलेल्या ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला.अपघातामुळे मुंबई वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपघातस्थळी दाखल झालेले महामार्ग सुरक्षा विभागाचे कर्मचारी, मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरु केले होते.क्रेनच्या साहाय्याने दीड तास प्रयत्न केल्यानंतर चालकाचा मृतदेह केबिनच्या बाहेर काढण्यात यश आले.
याप्रकरणी महामार्गावर धोकादायक पद्धतीने ट्रक उभा करून अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक मोहम्मद लोरेब मोहम्मद इस्माईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात दुचाकीस्वार ठार
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टेन गावाच्या हद्दीतील एका हॉटेल मध्ये समोर गुजरात मार्गीकेवर गुरुवार पहाटेच्या सुमारास भारधाव वेगातील टेम्पो दुभाजक ओलांडून मुंबई मार्गीकेवर आल्याने मुंबई मार्गीकेवरील भरधाव वेगातील दुचाकी टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. निनाद लसणे, (31)रा.भिवंडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव होते. महामार्गावर रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवुन दुचाकस्वाराच्या मृत्यूला कारण ठरला असताना अपघाताची खबर न देता पळुन गेल्या प्रकरणी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.