Palghar Zilla Parishad Pudhari
पालघर

Palghar ZP | शासकीय व शैक्षणिक अभिलेखांच्या जतनाबाबत पालघर जिल्हा परिषदेची उदासीनता?

जन्म मृत्यू नोंदी, शैक्षणिक दाखले जीर्ण, ई रेकॉर्ड जतन करणे काळाची गरज

पुढारी वृत्तसेवा

Palghar Zilla Parishad

दीपक गायकवाड

खोडाळा : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि प्राथमिक शाळांमधील महत्त्वाच्या शासकीय व शैक्षणिक अभिलेखांच्या जतनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जन्म-मृत्यू नोंदवही, शाळांतील जनरल रजिस्टर तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे कालांतराने जीर्ण होत असून त्यांचे डिजिटायझेशन करून ई-रेकॉर्ड स्वरूपात जतन करण्याची मागणी होत आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद स्तरावर अपेक्षित गतीने कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार शासकीय अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन, जतन आणि आवश्यकतेनुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदी ठेवण्यासंबंधी तरतुदी आहेत. या पार्श्वभूमीवर जुने अभिलेख स्कॅन करून ई-रेकॉर्ड स्वरूपात जतन करणे ही काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू नोंदी आणि प्राथमिक शाळांतील जनरल रजिस्टर ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जनरल रजिस्टरची दुसरी प्रत तयार करता येत नाही किंवा ते सहज हलवून बांधणीही करता येत नसल्याने त्याच्या सुरक्षित जतनाला विशेष महत्त्व आहे. मात्र, अनेक ठिकाणी या अभिलेखांची स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे दिसून येत आहे.

महसूल विभागाने अनेक ठिकाणी ई-रेकॉर्ड प्रणाली विकसित करून जमिनीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती सहज मिळते. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद प्रशासनानेही शैक्षणिक व ग्रामपंचायत अभिलेखांचे डिजिटायझेशन करावे, अशी मागणी होत आहे.

अभिलेख कक्षामध्ये वाळवी, उंदीर व इतर कीटकांपासून संरक्षण, योग्य तापमान आणि सूर्यप्रकाशापासून बचाव अशा मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, पंचायत समिती स्तरावरील अभिलेखांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोखाडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, जुने अभिलेख सध्या सनावळीनुसार वर्गीकरण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ नुसार दहा वर्षांहून जुने शासकीय अभिलेख विनापरवानगी नष्ट करता येत नाहीत किंवा त्यामध्ये फेरफार करता येत नाही. मात्र, अभिलेखांचे योग्य संरक्षण न झाल्यास ते नैसर्गिकरीत्या नष्ट होण्याचा धोका कायम असल्याने त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

जनरल रजिस्टर हा शाळेतील सर्वात महत्त्वाचा अभिलेख मानला जातो. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, प्रवेश दिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, पूर्वीची शाळा यांसारखी मूलभूत माहिती यामध्ये नोंदवलेली असते. याच आधारे बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला आणि रजिस्टर उतारा दिला जातो. त्यामुळे या अभिलेखाचे सुरक्षित जतन अत्यावश्यक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकार सांगतात.

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासह जात प्रमाणपत्र, पासपोर्ट आणि इतर शासकीय कामांसाठी आवश्यक दस्तऐवज आहे. मात्र, अनेक ठिकाणी जुने अभिलेख जीर्ण झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते.

निर्णय झाला; अंमलबजावणीची प्रतीक्षा

शासनाने जनरल रजिस्टरचे संगणकीकरण करण्यासाठी एक्सेल-आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणालीमध्ये जनरल रजिस्टर क्रमांक टाकल्यानंतर बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा तत्काळ उपलब्ध होऊ शकतो. मात्र, या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी पालघर जिल्हा परिषद स्तरावर अद्याप झालेली नसल्याची बाब समोर येत आहे.

ई-रेकॉर्ड प्रणालीद्वारे जुने अभिलेख सुरक्षित ठेवण्याची मागणी सातत्याने होत असली तरी त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या विषयावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांच्याशीही संपर्क साधण्यात आला; मात्र या वृत्ताला प्रतिसाद मिळू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT