Thane Palghar District Bank Results: ठाणे जिल्हा बँकेवर प्रथमच महायुतीचा झेंडा; भाजपचे अरुण पाटील अध्यक्ष, तर भाग्यश्री भोईर उपाध्यक्ष

फुटलेल्या दोन मतांवर राजकीय रंग
Thane Palghar District Bank Results
Thane Palghar District Bank ResultsPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले अध्यक्षपद मिळविण्यावरून भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी यांच्यात तीव्र मतभेद होऊन सहकार पॅनलमध्ये उभी फूट पडली आणि अखेर ठाणे जिल्हा बँकेवर प्रथमच कमळ फुलले.

शनिवारी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत सहकार पॅनलमधील भाजपचे उमेदवार अरुण पाटील यांना मतदान करून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांचा धुव्वा उडविला.

अध्यक्ष अरुण पाटील यांना १४ मते, तर मनीष पाटील यांना सात मते पडली. उपाध्यक्षपदी सहकार पॅनलच्या भाग्यश्री भोईर यांची बिनविरोध निवड झाली.

ठाणे -पालघर जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासात कधीच भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकलेला नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात बँक राहिली.

नुकत्याच झालेल्या संचालकांच्या निवडणुकीत सर्व पक्षीय सहकार पॅनलने २१ संचालकांपैकी १६ जागा जिंकल्या, तर परिवर्तन पॅनलने चार आणि एक अपक्ष संचालक जिंकून आला होता. त्यामुळे सहकार पॅनलचा अध्यक्ष होणार हे निश्चित होते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकणार असे भाकीत केले आणि त्यामागील खेळीचे सूत्रे सांगितले होते.

तेव्हापासून सहकार पॅनलमधील बहुजन विकास आघाडी, भाजप, शिवसेना यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. यावर तोडगा म्हणून तिन्ही पक्षांना दीड-दीड वर्ष अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले अध्यक्षपद भाजपाला घेण्याचे निर्देश दिल्याने सहकार पॅनलचे प्रमुख आमदार किसन कथोरे यांनी विद्यमान उपाध्यक्ष अरुण पाटील या अनुभवी संचालकाला अध्यक्षपदाची संधी दिली.

Thane Palghar District Bank Results
Mumbai Police MD Seizure: वाडीबंदरला ‘एमडी’साठीचे रसायन जप्त; कारखान्याचे धागेदोरे उघड

बहुजन विकास आघाडीने पहिले वर्ष आपल्यालाच मिळावे याकरिता मनीष पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन विकास आघाडीने अध्यक्षपदावरील दावा कायम ठेवल्याने सहकार पॅनल फुटीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले.

शनिवारी सकाळी अध्यक्षपदासाठी सहकार पॅनलमधून अरुण पाटील आणि मनीष राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले, तर परिवर्तन पॅनलचे आकाश बाबाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र परिवर्तन पॅनलने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आकाश पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गटाचे उमेदवार अरुण पाटील यांच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे अरुण पाटील यांना १४ मते, तर मनीष पाटील यांना ७ मते पडली. सात मतांच्या फरकाने अरुण पाटील विजयी झाले.

बहुजन विकास आघाडीकडे ५ मते असताना वाढीव दोन मते कुणाची पडली, यावरून नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. भाजपच्या दुसऱ्या गटाकडून बविआला मतदान केले असावे, अशी नवीन चर्चा आहे.

Thane Palghar District Bank Results
Traffic Police Transfer: वाहतूक विभागात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; १२ पोलीस निरीक्षकांना नव्या ठिकाणी जबाबदारी

उपाध्यक्षपदी भाग्यश्री भोईर या बिनविरोध निवडून आल्या. कारण शिवसेनेचे आमदार अमित घोडा आणि ज्योती पटेकर या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपचा अध्यक्ष झाला असून शेवटचे दीड वर्ष शिवसेनेला अध्यक्षपदाची संधी दिली जाणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय हा रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा मानला जातो.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत झाली असली, तरीही बहुजन विकास आघाडीचे बँकेवर वर्षानुवर्षे असणारे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये उभे केले होते.

एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र एकजूट दिसून आली, हा रवींद्र चव्हाण यांच्या डावपेचांचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी शिवसेनेचे एक मत फुटल्याने एकनाथ शिंदे यांना हादरा बसला असल्याचे म्हटले जाते.

थोडक्यात, या राजकीय नाट्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपा-शिवसेना महायुतीकडे गेले आहे. अखेर बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील यांची तसेच उपाध्यक्ष पदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व उलथवण्यात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे या जोडीला यश आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news