पालघर : हनिफ शेख
पुर्वीपेक्षा आज पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची असेल किंवा राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल. मात्र ती किती सक्षम झाली याबद्दल आजही संशोधन होणे आवश्यक आहे. कारण की जिल्ह्यातील वसई पासून मोखाड्यापर्यंत तिकडे थेट तलासरीपर्यंत आजही सक्षम आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यांचा एवढेच काय तर राज्याचा देखील आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसून येते.
याबाबत अनेकदा आरोग्य विभागाची रिक्त पदे, आरोग्य सुविधांची कमतरता याबाबत अनेक बातम्या प्रकाश झोतात येत असतात.त्याचवेळी आरोग्य यंत्रणांकडून मात्र पत्रकार परिषदा घेऊन किंवा खुलासे देऊन त्या समस्या कागदोपत्री झाकण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो. मात्र जिल्ह्यातील आरोग्य विभागाची सत्य परिस्थिती स्वतः अनुभवत त्या भागातील दौरे करून विधान परिषदेच्या आमदार आणि भाजपच्या नेत्या तसेच महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला आणि विधान परिषदेतील सभागृहात येथील समस्या पोटतीडकीने मांडल्या.
मुळात जेव्हा ह्या समस्या सभागृहात मांडण्यात आल्या त्याची वेळी काही दिवसात अगोदरच जिल्ह्यातील नऊ आयुष्यमान आरोग्य केंद्रांना त्यांच्या आरोग्य व्यवसबद्दल राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके असे राष्ट्रीय मानांकन मिळाले. तर जिल्ह्यातील अन्य 23 आयुष्यमान आरोग्य मंदिरांना राज्यस्तरीय मानांकन मिळाल्याने आरोग्य विभागाकडून तसेच शासकीय यंत्रणांकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आली. यामुळे एकीकडे या पुरस्कारांच्या यशोगाथा सांगितलेल्या जात असतानाच दुसरीकडे आमदार चित्रा वाघ यांनी या भागातील आरोग्याच्या व्यथा स्वतः अनुभव घेऊन सभागृहात मांडल्या यामुळे हा एकीकडे विरोधाभास दिसून येत आहेत. मात्र सत्ताधारी आमदारांनी आरोग्य विभागाला पर्यायाने सरकारलाच घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची आता समोर येत आहे.
आमदार चित्र वाघ यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर त्यांनी सभागृहात सागितले की मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्य मंत्री यांच्या प्रयत्नामुळे राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक चांगली कामे सुरू आहेत. परंतु तीन दिवस पालघर जिल्ह्यात वास्तव्यास राहून प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले 2014 पासून सुरू असलेले ट्रॉमा सेंटरचे काम आजही अपूर्ण आहे. धुंदलवाडी हायवेवर अपघात झाल्यास तात्काळ उपचारासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही अशी वस्तुस्थिती देखील त्यांनी विधान परिषदेच्या सभागृहात मांडली. याचवेळी आपत्कालीन परिस्थितीत तलासरी येथील रुग्णांना शेजारील गुजरात राज्य किंवा सिल्वासा येथे जावे लागते.परंतु तेथे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा लागू होत नाही त्यामुळे आपल्या राज्यातील नागरिकांना तिथे उपचार मिळत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
सरकार चांगले काम करत आहे. पण ते पालघर पर्यंत पोचलेले नाही म्हणूनच पालघर मधील मोडकडलीस आलेली आरोग्यवस्था उभी करणे आवश्यक आहे.यासाठी अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत दुर्गम भागात विशेष आरोग्य बळकटीकरण योजना राबवावी अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करावी हे सांगताना पालघरकरांना त्यांच्या जिल्ह्यातच सक्षम सुरक्षित आणि सन्मान जनक आरोग्यसेवा मिळाली पाहिजे हीच माझी आग्रही मागणी असल्याचे वाघ यांनी यावेळी ठणकावून सांगितले. याला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मी या भागाचा दौरा करून या समस्या नक्कीच बघेल आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करील असे उत्तर देखील याला दिले.