खानिवडे : विश्वनाथ एस. कुडू
एका मनुष्याला दरवर्षी 280 किलो ऑक्सीजन लागतो. मात्र दरदिवशी तीन फूट वाढणारा बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सीजन निर्मिती करतोच,पण 35 टक्के कार्बन ही शोषून घेऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठे योगदान देतो. त्यामुळे पालघर जिल्ह्यात ठरवलेल्या उद्दीष्टाप्रमाणे होणाऱ्या बांबू लागवडीमुळे जिल्हा पर्यावरण, आर्थिक, सामाजिक आणि बांबू कलेच्या वस्तूंनी समृद्ध होणार आहे. मात्र यासाठी संकल्पित बांबू लागवड उद्दीष्ट लवकरात लवकर गाठले पाहिजे. बांबू लागवडीला प्रोत्साहन म्हणून रोहयो योजनेतून महाराष्ट्र सरकार हेक्टरी 7 लाख चार हजार रुपयांचे अनुदान देत आहे. यामध्ये मजुरी आणि खड्डे खोदणे तसेच रोपांचा पुरवठा करण्याच्या खर्चाचा देखील समावेश आहे.
आताच्या घडीला पालघर जिल्ह्यातील भात शेती आता बिलकुल परवडण्यासारखी राहिली नाही. पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही , तसेच काही शिल्लक देखील राहत नाही. त्यामुळे आता शहरी लोकांसाठी ऑक्सिजन निर्माण करणारा बांबू अधिक सरकारचे अनुदान आणि बांबू पासून निर्माण होणाऱ्या 2000 पर्यावरणपूरक व आकर्षक निरनिराळ्या शोभेच्या तसेच गृहपयोगी वस्तू आगामी काळात सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य परिवर्तित करणाऱ्या ठरणार आहेत .यासाठी मागील अर्थसंकल्पात बांबू आधारित उद्योगांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने 4300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर प्रस्तावित स्किल टेक विद्यापीठाच्या माध्यमातून बांबू उद्योगांमधील कौशल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील हाती घेण्यात येणार आहेत
सुमारे 20 - 21 वर्षांपूर्वी आपल्याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हापूस आंबा आणि काजूचे पिक सोडून बांबूचे पीक स्वीकारले. आज सिंधुदुर्ग मधले बांबू उत्पादक शेतकरी स्वयंपूर्ण झाले आहेत .हाच पॅटर्न अगदी समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या पालघर मध्ये देखील यशस्वीच होऊ शकतो .यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवड व त्याचे फायदे याचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. शासन स्तरावरील बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून बांबू लागवड इच्छुक शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जावर तातडीने प्रक्रिया करून बांबू लागवडीचे स्वतंत्र अनुदान आणि शेततळ्याचे स्वतंत्र अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे .
बांबू लागवड ही अनेक कारणांमुळे अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर ठरते.कशी तर बांबू हवामान बदलाचा सामना करण्यात मदत करतो. तो मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषतो आणि ऑक्सिजन निर्माण करतो. बांबूची मळे ही जमिनीत खोलवर जातात, तयामुळे मदा धूप रोखली जाऊन मृदा संरक्षण होते. बांबू मळे भुगर्भातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याने जलसंवर्धन होते .
घटत्या वनराईमुळे होणारा वातावरणातील आमूलाग्र बदल हा मानवी जीवनावर परिणामकारक ठरणारा आहे.मात्र याच बरोबर जर आपण प्रत्येकाने वृक्ष लागवडीची कास धरली तर पुढील काळात पर्यावरणाचा संतुलन राखला जाईल व मानवी जीवनासह प्राणी मात्रांना लाभदायक होईल.यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणजे वृक्ष रोपांचे वाटप हे वृक्ष लागवडीला चालना देणारे आहे .त्यात बहुउपयोगी बांबू लागवडीचे महत्व हे खूप मोठे आहे.यामुळे ऑक्सिजन निर्मिती होईलच पण आर्थिक बाब ही सांभाळली जाणार आहे. यासाठी वसईतील जास्तीत जास्त नागरिकांनी बांबू लागवडीत सहभागी झाले पाहिजे.