खोडाळा : आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट स्थानी भरणारा बाजार. मॉलच्या जमान्यातही ग्रामीण भागात आठवडे बाजार आपलं अस्तित्व टिकवून आहेत. प्रत्येक गावात आठवडे बाजार भरत असतो.मोखाडा तालुक्यात दस्तूरखुद्द मोखाडा येथे शुक्रवारी तर खोडाळा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो.परंतू स्थानिक मजूरांचे स्थलांतर आणि रोहयो यंत्रणेच्या चालढकलपणामूळे आठवडी बाजार आजघडीला पुर्णतः रोडावलेले आहेत.
स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा स्थलांतर थांबावे या उद्देशाने रोजगार हमी कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अमलबजावणी होत नसल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे.यंत्रणांची चालढकल आणि नरेगाच्या कामांबाबत 50% भागधारक असलेल्या ग्रामपंचायत प्रशासना सोबतच हमेशा मुबलक कामं देणाऱ्या तालुका कृषी विभागानेही कमालीचे औदासिन्य दाखवल्यामूळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण दिसून येत आहे. 1977-78 मध्ये या योजनेचे कायद्यात रूपांतर केले आहे.
या कायद्याच्या धर्तीवर 2005 मध्ये रोजगार हमी कायदा लागू करून या कायद्यातील तरदूतीचे आणि महाराष्ट्राच्या मूळ रोहयोतील तरदूतीचे एकत्रिकरण करून देशातील सर्वच राज्यामध्ये व महाराष्ट्र रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) कार्यान्वित होती. परंतु शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम केले जात असल्याने आदिवासींची रोजगारा अभावी होणारी फरपट थांबलेली नाही. या योजनेत मागेल त्याला कामही मिळत नाही आणि 15 दिवसात दामही मिळत नाही.त्यामुळे मजुर वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारख्या मिळेल त्या कामाच्या शोधात कुटुंबासह फिरतो , संघर्ष करीत राहतो.
नुकत्याच आलेल्या महसूल विभागाकडील साप्ताहिक अहवालानुसार तालुक्यात 358 कामे चालू असून त्यावर 9964 मजूरांना काम देण्यात आले आहे.तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षात 23680 मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यामधून 437937 एवढी मनुष्य दिन निर्मिती झालेली असुन तालुक्यात एकुण 1437 यंत्रणेची कामे शेल्फवर असून 733807 मनुष्य दिन निर्मितीची कामे उपलब्ध असुन त्यानुसार मजुरांना कामे पुरविण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील एकूण नरेगाच्या कामांच्या पटीत 50% कामे ही ग्रामपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून द्यायची आहेत.परंतू ग्रामपंचायत प्रशासन त्याबाबत कमालीची हलगर्जी करत असल्याने स्थानिक ठिकाणीच रोजगार निर्मितीवर त्याचा दुष्परिणाम होत आहे.पर्यायाने वाड्या वस्त्या कुटूंब कबिल्यासह रोजगाराच्या शोधात विस्थापित झालेल्या आहेत.बंधाऱ्यातील गाळ उपसा,नाले सफाईची 23 कामे तसेच रस्त्यांची 2 कामे अशी एकूण 25 कामे मिळून श ग्रामपंचायत स्तरावर एकूण 183 कामे चालू आहेत व त्यावर 6418 इतकी मजूर उपस्थिती आहे यामध्ये घरकुल 158 कामे असून त्यावर 493 मजूरांची उपस्थिती आहे.तर सार्वजनिक हिताची केवळ 25 कामे उपलब्ध करून देत ग्रामपंचायत प्रशासनाने हात आखडता घेतला आहे.