डहाणू : डहाणू तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील सावटा पाथरपाडा वस्तीतील नागरिकांना गेल्या चार वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप या समस्येवर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेजाऱ्यांच्या घरांकडे जावे लागत असून, आंघोळ व दैनंदिन वापरासाठी नदीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वस्तीतील केवळ आठ ते दहा घरांनाच ग्रामपंचायतीच्या नळ योजनेतून पाणी मिळते. उर्वरित सुमारे तीस ते पस्तीस घरांपर्यंत नळपाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी इतरांच्या घरांवर अवलंबून राहावे लागत आहे. दैनंदिन वापरासाठी वापरले जाणारे नदीचे पाणी दूषित असल्याने आजार होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
या पाणीटंचाई बाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. दि. 9 मे 2023 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी लेखी तक्रारीही सादर करण्यात आल्या. मात्र, तरीही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाड्याच्या सुरुवातीच्या काही घरांपर्यंत नळाचे पाणी येत असताना उर्वरित घरांपर्यंत पाणीपुरवठा का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सावटा पाथरपाडा वस्तीतील सर्व नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा कधी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी दुसऱ्यांच्या घरातून आणावे लागत आहे. आंघोळीसाठी व इतर वापरासाठी नदीतील पाणी वापरावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीने ही अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाय योजना करावी.विदेश माच्छी, ग्रामस्थ पाथरपाडा.
ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यापासून नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाथरपाडा येथील पाण्याची समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिनीची तपासणी सुरू आहे. जल वाहिनीमध्ये काही तांत्रिक अडचण आहे का, याची पाहणी करण्यात येत असून, ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. लवकरच पाड्यातील सर्व कुटुंबांना पुरेसे व शुद्ध पाणी मिळेल.विलास पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सरावली