मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जगप्रसिद्ध १०८ फूट विशालकाय मूर्तीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महामस्तकाभिषेक सोहळ्याला बुधवारी (दि. १५) भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. भल्या पहाटेपासूनच शेकडो भाविकांनी हजेरी लावली.
मांगीतुंगी पर्वतावर चेन्नई येथील कमल ढोलिया यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होऊन महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर पारंपरिक विधी होऊन सकाळी १० वाजता गाजियाबादचे उद्योजक जम्बूप्रसाद जैन, विद्यप्रकाश जैन, सुरतचे उद्योजक संजय व अजय दिवाण यांच्या हस्ते कलशाभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात गणिनीप्रमुख ज्ञानमती माता, आर्यिका चंदनामती माता यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.
रवींद्रकीर्ती स्वामी, डॉ. पन्नालाल पापडीवाल, जयचंद कासलीवाल आदी ट्रस्टी यांच्या देखरेखीखाली कार्यक्रम पार पडला. भाविकांच्या लेझिम पथकांने संगीताच्या तालावर पदन्यास केला, तेव्हा भाविकांनीही ठेका धरला.
पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी देखील कलशपूजन केले. दरम्यान, पर्वताखालील श्री ऋषभदेवपुरम येथे भाविकांसाठी विश्रामगृह आणि भोजनाची मोफत व्यवस्था केली आहे. ३० जूनपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.