समुद्रातही ‘आरएनए’ विषाणूंचा गुप्त दबदबा | पुढारी

समुद्रातही ‘आरएनए’ विषाणूंचा गुप्त दबदबा

न्यूयॉर्क : जगातील महासागरांमध्ये हजारो रहस्यमय विषाणूंचे छुपे राज्य आहे. त्यांचा इको-सिस्टीमवरही मोठाच प्रभाव पडत असावा असे संशोधकांना वाटते. ते ज्या सजीवात संक्रमण करतात त्याचे ‘रिप्रोग्रॅमिंग’ करून इको-सिस्टीमवर हा प्रभाव निर्माण होत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. ‘डीएनए’चे ‘मॉलेक्यूलर’ (रेणू) भाऊबंद असलेले ‘आरएनए’ने युक्त असे हे विषाणू आहेत.

आपल्याला अनेक आरएनए विषाणू हे माणसामधील रोगांसंदर्भात माहिती आहेत. कोरोना व्हायरस किंवा एन्फ्लुएंझा व्हायरस हे आरएनए विषाणूच असतात. मात्र, महासागरांमधील आरएनए विषाणूंचा विचार करता संशोधक त्यांचे वैविध्य आणि ज्या ज्या जीवांना ते संक्रमित करतात त्यांची यादी पाहूनच थक्क होतात. ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीतील गिलोर्मो डॉमिन्झ-ह्युर्ता यांनी एका नव्या संशोधनानंतर सांगितले की महासागरांमधील आरएनए विषाणू हे सूक्ष्म जीव, बुरशीपासून ते काही प्रमाणात अपृष्ठवंशीय प्राण्यांपर्यंत अनेकांना संक्रमित करीत असतील असे आम्हाला खात्रीने वाटते. काही जीवांना ‘युकॅरिओटस्’ असे म्हटले जाते.

हे अनोख्या, जटील पेशी असलेले जीव असतात. त्यांच्यामधील जनुकीय सामग्री ही त्यांच्या पेशीतील केंद्रकात असते. अशा जीवांनाही हे आरएनए विषाणू संक्रमित करीत असावेत. शैवाल आणि अमिबांनाही हे विषाणू संक्रमित करतात. हे दोन्हींकडून वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. त्यामुळे महासागरांमध्ये किती कार्बन डायऑक्साईड साठवून ठेवला जातो या गोष्टीवर प्रभाव पडतो. टेनेसी नॉक्सविली युनिव्हर्सिटीचे स्टीव्हन विल्हेम यांनी सांगितले की महासागरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड प्रवाहित होऊ शकतो यावर या आरएनए विषाणूंचे अशा सजीवांमधील संक्रमणाचा प्रभाव पडतो.

Back to top button