

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात डायनासोर फोसाईल नॅशनल पार्क आहे. तिथे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना डायनासोरचे एक अजब अंडे सापडले. या अंड्याच्या आत आणखी एक अंडे आहे! अशा प्रकारचे डायनासोरचे अंडे जगात प्रथमच सापडले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायंटिफिक रिपोर्टस्' या नियतकालिकात देण्यात आली आहे.
हे अंडे टायटनोसॉरिड प्रजातीच्या डायनासोरचे आहे. याठिकाणी एकूण दहा अंडी सापडली. त्यापैकी एका अंड्याच्या आत आणखी एक अंडे आहे. या दुर्लभ अंड्यात दोन गोलाकार शेल्स म्हणजेच कवच असून दोन्हींच्या दरम्यान काही अंतर आहे. मोठ्या अंड्याचा व्यास 16.6 सेंटीमीटर आणि छोट्या अंड्याचा व्यास 14.7 सेंटीमीटर आहे. या अंड्याच्या अभ्यासातून डायनासोरच्या प्रजननाबाबतही माहिती मिळू शकेल असे संशोधकांना वाटते.
डायनासोरचे प्रजनन हे सरडे आणि कासवांच्या ऐवजी मगरी व पक्ष्यांसारखे होत असावे. आतापर्यंत त्यांचे प्रजनन हे सरीसृपांसारखेच असावे असे मानले जात होते. मात्र, आता अंड्यातही अंडे सापडले आहे आणि असा प्रकार पक्ष्यांच्या अंड्याबाबत बर्याच वेळा होत असतो. त्यामुळे कालौघात डायनासोर प्रजातींमध्ये पक्ष्यांसारखी प्रजनन प्रक्रिया आलेली असू शकते असे संशोधकांना वाटते. मध्य भारताची भूमी ही डायनासोरच्या जीवाश्मांसाठीही ओळखली जाते. पश्चिम भारतातही डायनासोरचे जीवाश्म मिळण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांना बाग शहराजवळील पडलिया गावाजवळ मोठ्या प्रमाणात टायटनोसॉरिड डायनासोरचे जीवाश्म शोधलेले आहेत. त्यामध्ये सांगाड्यांपासून अंड्यांपर्यंत अनेक प्रकार आहेत. हे डायनासोर 40 ते 50 फूट लांबीचे होते. ते विशेषतः दक्षिण गोलार्धात क्रेटॅशियस काळात वावरत
होते.