उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या वारकर्‍याची आगळीच भक्ती ; 800 पानी ‘ज्ञानेश्वरी’ केली हस्तलिखित

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
'नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी…एक तरी ओवी अनुभवावी…' ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची भलावण करताना त्यांनी, एकतरी ओवीचा अनुभव घेतल्यास आयुष्याचे कल्याण होईल, असे म्हटले आहे. माउलींनी गीता प्राकृतमध्ये रचली. सामान्य माणसासाठी संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या रूपाने निरूपण केले. आपल्यातील बहुतेकांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केले आहे. मात्र, संपूर्ण ज्ञानेश्वरीच हस्तलिखित करण्याची किमया नैताळे येथील अक्षरमित्र मधुकर कोल्हे या शेतकरीपुत्राने केली आहे.

संस्कृत भाषा आणि त्यातल्या त्यात ग्रंथ हस्तलिखित करणं एवढं सोपं नक्कीच नाही. ग्रंथ लिहिण्यासाठी अक्षरांशी एकरूप व्हावं लागतं. यात काना, मात्रा, वेलांटी, उकार यात काही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मात्र, हे अवघड शिवधनुष्य कोल्हे यांनी पेलले आहे. कोल्हे यांनी ज्ञानेश्वरीचे संपूर्ण 18 अध्यायांतील गीतेचे 700 श्लोक व तब्बल 90033 ओव्या, पसायदान हस्तलिखित केले आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या वहीचे 800 पाने लागली आहेत.

सन 2003 ला कोल्हे यांना पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याचा योग आला. या काळात आळंदी येथे गो. म. केंद्रे महाराज यांनी ज्ञानेश्वरी मंदिराचे काम सुरू केले होते. केंद्रे महाराजांनी ज्ञानेश्वरीची 108 पारायणे केली आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराजांच्या मुखोद्गत होता. हे बघून कोल्हे यांना ज्ञानेश्वरी वाचनाची आवड निर्माण झाली. घरी जसे जमेल तसे कधी 10, कधी 20, तर कधी पन्नास-शंभर ओव्यांचे ते पठण करत. त्यांना बर्‍याच शब्दांचे अर्थ समजत नव्हते, मग त्यांनी 'सार्थ ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ आणला आणि त्यातून शुद्ध मराठीत केलेला अनुवाद समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना संस्कृतमधील श्लोक वाचता येत नव्हते.

2016 मध्ये नैताळे गावातील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रथम ज्ञानेश्वरी पारायण केले. चार-दोन वेळेस पारायण केल्यानंतर उच्चार कळायला लागले. तोपर्यंत आळंदी येथील ज्ञानेश्वरी मंदिराचे काम पूर्ण झाले होते. ही वास्तू पाहिल्यानंतर कोल्हे यांच्या मनामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाण करण्याचा विचार आला. 2020 अक्षयतृतीयेला त्यांनी लिखाण करण्यास आरंभ केला. शेतीव्यवसाय सांभाळत दिवसभर शेतीची कामे करायची व संध्याकाळी लिहायला बसायचं. कधी 10, कधी 30, तर कधी 50 ओव्या रोज लिहायला सुरुवात केली. अतिशय क्लिष्ट अशी जोडाक्षरे लिहिताना चूक न होऊ देणे हे काम सोपे नाही, त्यातून चूक झाली तर खाडाखोड करण्यास वाव नाही. असे असतानाही हे काम त्यांनी अत्यंत एकाग्रतेने पूर्ण केले. ज्ञानेश्वरीच्या मुखपृष्ठावर हस्तलिखित, ज्ञानेश्वर माउली यांचे चित्र, आतील पानात सुरुवातीला प्रस्तावना, संपूर्ण ओव्या व शेवटी पसायदान अशी रचना करण्यात आली आहे.
या हस्तलिखित ग्रंथाची विशेषता म्हणजे यातील लेखन संपूर्ण ओळीखाली लिहिण्यात आले आहे. ग्रंथावरून नजर फिरवली असता अत्यंत सुंदर अक्षर आहे. 10 एप्रिल रोजी त्यांनी ग्रंथ लिहून पूर्ण केला आहे.

'माझिया सत्य वादाचे तप, वाचा केले बहुत कल्प.' असे माउली म्हणतात म्हणून मी संस्कृतमधील ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीमध्ये सांगू शकलो. काम कितीही कठीण असले, तरी आवड असली की सवड मिळते.
– मधुकर कोल्हे, वारकरी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT