कोल्हापूर : रंकाळा तलाव कोनशिलेवर पिचकारी; इतिहासप्रेमींकडून तीव्र शब्दांत निषेध | पुढारी

कोल्हापूर : रंकाळा तलाव कोनशिलेवर पिचकारी; इतिहासप्रेमींकडून तीव्र शब्दांत निषेध

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार्‍या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या कोनशिलेवर थुंकणार्‍या थुकाराचा सोशल मीडियावरून इतिहासप्रेमींनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. संगमरवरी कोनशिलेवर गुटख्या-माव्याची पिचकारी पडल्याचे चित्र व्हायरल होताच अस्सल कोल्हापुरी रांगड्या भाषेत इतिहासप्रेमींनी त्या थुकाराचा खरपूस समाचार घेतला. याचबरोबर यासाठी कारणीभूत ठरणार्‍या स्थानिक मनपा प्रशासनावरही टीका केली.

रंकाळा तलावाभोवती काळ्या दगडातील आकर्षक नक्षीदार घाट बांधल्यानंतर याची माहिती देणारी संगमरवीर कोनशिला रंकाळा टॉवर परिसरातील राजघाटावर बसविण्यात आल्या आहेत. एकीकडे मराठी व दुसरीकडे इंग्रजी भाषेतील या कोनशिला आहेत. यातील एका कोनशिलेवर गुटखा-माव्याची पिचकारी आणि शेजारी कचर्‍याचा ढीग साठल्याचे चित्र मंगळवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाले.

यावर इतिहासप्रेमी व कोल्हापूर प्रेमी नागरिकांनी शेलक्या भाषेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘कसले आम्ही कोल्हापुरी जगात भारी?’, किंमत नाही-बेशिस्त लोकं, भंपक जनता आणि भंपक प्रशासनाचा नमुना, जतनाची प्रवृत्ती मनपा व लोकांमध्येही नाही, पायतानाने तोंड फोडले पाहिजे थुंकणार्‍यांचे, सुधारणार नाहीत, बंदी असूनही गुटखा-मावा विक्रीचा परिणाम या व अशा प्रतिक्रिया याबाबत उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यात आल्या. याचबरोबर रंकाळा तलाव परिसरात सीसीटीव्ही बसवावा, तेथील चित्रीकरण सार्वजनिक करावे, ऐतिहासिक वास्तूंवरील कोनशिलेचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर पारदर्शी अ‍ॅक्रॅलिक प्लेट व फ—ेम बसवावी, महापालिका प्रशासनाने यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही करून या मोहिमेत सहभागी होण्याची तयारीही अनेक सुज्ञ नागरिकांकडून दर्शविण्यात आली.

Back to top button