उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

गणेश सोनवणे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
औदुंबरनगर-अमृतधाम परिसरातील रस्त्यावरून जाताना मोलमजुरी करणारी महिला भररस्त्यात प्रसूत झाल्याची घटना घडली. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. शुक्रवारी (दि.29) दुपारी 12.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत माजी नगरसेविका प्रियंका माने, डॉ. राजेंद्र बोरसे व स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने महिलेच्या प्रसूतीनंतरची प्रक्रिया सुखरूप पार पडल्याचे दिसून आले.

औदुंबरनगर-अमृतधाम येथील रस्त्यावरून शीतल विकी कांबळे ही मोलमजुरी करणारी गरोदर महिला जात असताना तिच्या पोटात कळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली होती. वेदना असह्य झाल्याने ती या ठिकाणीच प्रसूत झाली. तिची अवस्था बघून परिसरातील महिला व नागरिकांनी जवळच्याच डॉ. राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांना फोन केला. डॉ. बोरसे यांनी क्लिनिकमधील रुग्ण सोडून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत माजी नगरसेविका माने यादेखील जवळील मनपाच्या आरोग्य केंद्रातून डॉ. बस्ते यांच्यासह वैशाली धिवर, छाया जाधव या दोन महिला परिचारिकांना आपल्या वाहनामध्ये घेऊन हजर झाल्या. डॉ. बोरसे यांनी परिचारिकांच्या मदतीने त्या महिलेची प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण केली. यात त्या महिलेने जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. यावेळी माने यांनी पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांच्याशी डॉ. बोरसे यांचे बोलणे करून दिले. डॉ. बोरसे यांनी घडलेला प्रकार डॉ. देवकर यांना सांगितला. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूत झालेली महिला व नवजात जुळ्या मुली या सुखरूप असल्याची माहिती डॉ. देवकर यांनी दिली. डॉ. बोरसे व माजी नगरसेविका माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने संबंधित महिलेची प्रसूती सुकर झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

याप्रसंगी धनंजय माने, विलास कारेगावकर, ज्ञानेश्वर सोमासे, मनोज कोलते, रमेश वानखेडे, भामरे, कोलते, वानखेडे, जाधव व परिसरातील महिलांनी मदतीत सहभाग नोंदविला.

पती धनंजय माने व मी कार्यकर्त्यांसह संपर्क कार्यालयात मनपा निवडणुकीची ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया बघत होतो. त्यावेळी अचानक प्रभागातील काही नागरिकांचा फोन आला. एक महिला रस्त्यातच प्रसूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही क्षणाचाही विलंब न करता, त्वरित मनपा आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. तेथून डॉक्टर व परिचारिकांना वाहनात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डॉ. देवकर यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेला रुग्णवाहिकेद्वारे इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.
– प्रियंका माने, माजी नगरसेविका

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT