राष्ट्रकुल महिला क्रिकेट : एश्लेघने हिसकावला भारताचा विजय; ऑस्ट्रेलियाची 3 विकेटस्नी मात | पुढारी

राष्ट्रकुल महिला क्रिकेट : एश्लेघने हिसकावला भारताचा विजय; ऑस्ट्रेलियाची 3 विकेटस्नी मात

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : 155 धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. 5 बाद 49 अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर हिने एकहाती सामना फिरवला. ग्रेस हॅरीसने 37 धावांची खेळी करून ऑसींचा डाव सावरला. त्यानंतर गार्डनरने एलाना किंगसोबत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आणि अश्यक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 3 विकेटस् व 6 चेंडू राखून हा सामना जिंकला.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने राष्ट्रकुल 2022 मध्ये अर्धशतक झळकावणार्‍या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शेफाली वर्मानेही 48 धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक एलिसा हिली हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. तिने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये यष्टिंमागे 100 बळी टिपण्याचा पराक्रम करताना महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.

स्मृती मानधना (24) व शेफाली यांनी चांगली सुरुवात करून दिली खरी, परंतु डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. यास्तिका भाटिया (8) व शेफाली यांच्यातला ताळमेळ चुकला अन् ऑसींना आयती विकेट मिळाली. जेमिमान रॉड्रिक्सही 11 धावा करून बाद झाली. शेफाली 33 चेंडूंत 9 चौकारांसह 48 धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला. तिने 34 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने 8 बाद 154 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही फार चांगली झाली नाही. दुसर्‍याच चेंडूव रेणुका सिंग ठाकूरने ऑसींना धक्का देताना एलिसा हिली (0) ला झेलबाद केले. त्यापाठोपाठ बेथ मूनी (10), कर्णधार मेग लॅनिंग (8) व ताहिला मॅकग्राथ (14) यांनी विकेट घेत रेणुकाने ऑस्ट्रेलियाला हादरवून सोडले.

रेणुकाने 4 षटकांत 18 धावा देताना 4 महत्त्वाच्या विकेटस् घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 34 अशी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा व मेघना सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेत ऑसींना 100 धावांवर 6 धक्के दिले. 37 धावा करणार्‍या ग्रेस हॅरीसची विकेट घेत मेघनाने मोठे यश मिळवले. दीप्तीने आणखी एक विकेट घेतली. पण, गार्डनरने 35 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा करताना ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. एलाना किंगने 16 चेंडूंत नाबाद 18 धावा केल्या. ऑसींनी 19 षटकांत 7 बाद 157 धावा करून विजय मिळवला.

Back to top button