नगर : ‘बॅकलॉग’ भरून निघाला ! जलाशयांमध्ये 31 टीएमसी पाण्याची आवक! | पुढारी

नगर : ‘बॅकलॉग’ भरून निघाला ! जलाशयांमध्ये 31 टीएमसी पाण्याची आवक!

नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदा जिल्ह्यात मान्सून काहीसा उशिरा दाखल झाला असला,तरी जुलैमध्ये झालेल्या सरासरी पावसामुळे हा ‘बॅकलॉग’ भरून निघाला आहे. गेल्या काही दिवसांत धरण पाणलोट आणि लाभक्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांमध्ये तब्बल 31 टीएमसीपेक्षा अधिक पाणी आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, भंडारदरा 15 ऑगस्टपूर्वीच ओव्हर फ्लो होणार आहे. निळवंडेनेही 80 टक्केची पातळी ओलांडली आहे, तर मुळा जलाशयांतही झपाट्याने पाणीसाठा वाढताना असल्याचे आनंददायी चित्र आहे.

निळवंडे धरणात 82 टक्के पाणीसाठा !

निळवंडे धरणाची पाणीसाठवण क्षमता 8320 दलघफू इतकी आहे. सध्या धरणात 8064 म्हणजे 82 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी 6778 दलघफू पाणी हे वापरायोग्य आहे. यंदाच्या पावसाळ्यात 844 मि.मी. इतका पाऊस झाला असून, जलाशयात 8166 दलघफू पाण्याची आवक झालेली आहे. निळवंडेतून प्रवरापात्रात 1500 क्युसेकने पाणी वाहते आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या आढाव्यानुसार जुलैअखेर 519 मि.मी. पावसाची नोंद होती, तर धरणात 3215 दलघफू पाणीसाठा होता.

‘मुळा’ची 80 टक्क्यांकडे झेप!
मुळा धरण हे राहुरीसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी या चार तालुक्यांसाठी वरदान ठरलेले आहे. पावसाळ्यात या धरणाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून असते. धरणाची क्षमता ही 26 हजार दलघफू आहे. सध्या धरणात 19531 दलघफू 76 टक्के पाणीसाठा आहे, यात 4500 दलघफू मृतसाठा वगळता 15031 दलघफू पाणी उपयुक्त आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत 183 मि.मी. पाऊस पडला असून, धरणात 13000 दलघफू पाणी नवीन दाखल झालेले आहे. गेल्यावर्षी जुलैअखेर धरण पाणलोटात 241 मि.मी. पाऊस झाला होता, तर पाणीसाठा मात्र 14205 दलघफू इतका होता.

आढळा हा छोटा प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने तो प्रारंभी ओव्हर फ्लो झालेला आहे. सध्या प्रकल्पात 1060 दलघफू पाणी आहे. घोड 4801, मांडओहोळ प्रकल्पात 58.43 दलघफू पाणीसाठा आहे. सीना 683, पारगाव 94, खैरी 171, विसापूर 517, मुसळवाडी 61, टाकळीभान 191 दलघफू पाणीसाठा आहे.

भंडारदर्‍यात 10 टीएमसी पाणी दाखल!
भंडारदरा धरणाची क्षमता 11,039 दलघफू इतकी आहे. सध्या धरणात 88 टक्के अर्थात 9681 दलघफू पाणीसाठा असून, यापैकी मृतसाठा वगळता 9381 दलघफू पाणी उपयुक्त आहे. 1 जूनपासून 28 जुलैपर्यंतच्या कालावधीत 2520 मि.मी पाऊस पडला असून, धरणात 10 हजार 487 दलघफू (10 टीएमसी) पाणी नव्याने दाखल झाले आहे. धरणातून 1167 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गेल्यावर्षी 28 जुलै 2021 अखेर भंडारदर्‍यात 8696 दलघफू पाणीसाठा होता, तर 1561 मि.मी. पावसाची नोंद होती.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस!
गतवर्षी जुलै अखेरपर्यंत भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, घोड, मांडओहळ, सीना, विसापूर, मुसळवाडी, पारगाव इत्यादी छोट्या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोटात मिळून सुमारे 3953 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद होती. यात भंडारदरा पाणलोटात सर्वाधिक 1561 मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी वरील प्रकल्पांतर्गत 5088 मि.मी. इतका पाऊस झाला होता. यामध्ये भंडारदरा पाणलोटात सर्वाधिक 2520 मि.मी. पावसाची आकडेवारी आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी सुमारे 1100 मि.मी. अधिक पाऊस पडल्याचे आकडे सांगत आहेत.

Back to top button