उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या यंत्रणांना सूचना

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय व तालुकस्तरीय नियंत्रण कक्ष निरंतर सुरू ठेवावे. तसेच मान्सून काळात लागणार्‍या शोध व बचाव साहित्याचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्त्या तत्काळ कराव्या, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि.14) मान्सूनपूर्व आढावा बैठक राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी व विभागीय आपत्ती व्यवस्थापक समन्वयक उपस्थित होते. आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, अधिकचा पाऊस झाल्यावर निर्माण होणार्‍या आपत्तीवर तत्काळ नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात असुरक्षित ठिकाणी मॉकड्रिल करावे.

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती, रस्ते, पूल आदींची तपासणी करावी. नियंत्रण कक्ष व तत्काळ प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित ठेवताना प्रत्येक जिल्ह्यात नागरी संरक्षण दल, होमगार्डस् यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याच्या सूचना गमे यांनी केल्या.

'गजर प्रणाली' विकसित करावी
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पाटबंधारे विभागाने धरणांतून किती क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे, याची नागरिकांना सूचना देण्यासाठी 'गजर प्रणाली' (अलार्म सिस्टिम) विकसित केले आहे. त्याप्रमाणे इतर जिल्ह्यांनीही अशी यंत्रणा विकसित करावी. जेणेकरून त्याद्वारे नागरिकांचा आपत्तीपासून बचाव करणे शक्य होईल, असे गमे म्हणाले.

नियंत्रण कक्षात कर्मचारी नेमावा
विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. सर्वच नियंत्रण कक्षांमध्ये 247 कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, जीवरक्षकांची, पोहणारे, गिर्यारोहक व सर्पमित्र आदींची यादी नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या. विभागाला विविध प्रकारचे 1 हजार 33 शोध व बचाव साहित्य उपलब्ध झाले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT