उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट

गणेश सोनवणे

नाशिक (वडांगळी) : पुढारी वृत्तसेवा
येथे ऐन पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत ठार केले. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

येथील शेतकरी नीलेश मालाणी यांची अडीच ते तीन वर्षांची कालवड बिबट्याने शुक्रवारी पहाटे ठार केली. गोठ्याबाहेर शेतात बांधलेली असल्याने बिबट्याने डाव साधला. परिसरातील आठ ते दहा कुत्रेही बिबट्याने यापूर्वीच फस्त केले आहेत. निमगाव सिन्नरकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला मालाणी यांची जमीन आहे.

परिसरात ऊस, मका आणि कडवाची पोटचारी यामुळे बिबट्याला लपायला जागा आहे. मालाणी यांचे सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनरक्षक वत्सला कांगणे, वनसेवक एन. व्ही. शिंदे यांनी सरपंच राहुल खुळे, प्रवीण निमसे, किरण निमसे, अरुण भवर, दीपक वारुंगसे, राजेंद्र खुळे यांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT