

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 1 सप्टेंबरपासून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांची आधीच्या वर्षांतील अभ्यासक्रमाच्या संकल्पनांच्या आकलन स्तराची चाचणीद्वारे निश्चिती करून त्याआधारे ज्ञानसुधारासाठीची उपचारात्मक अध्ययन-अध्यापन प्रक्रिया राबवली जाईल. यातून पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
कोरोना काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ऑनलाइन झाली. अध्यापकांचा विद्यार्थ्यांशी संवाद न झाल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्टता पुरेशी न झाल्याने, अपेक्षित अध्ययननिश्चिती झाली नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर झाला. आता शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर येत असताना आणि नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होत असताना विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या संकल्पनांचे आकलन होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांची आधीच्या वर्गातील संकल्पनांची उजळणी होणे आवश्यक आहे.
दहा ते वीस तासांचा उपचारात्मक कार्यक्रम
उपचारात्मक उपक्रमांतर्गत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या आकलन स्तराची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देण्यासाठी दहा ते वीस तासांचा उपचारात्मक कार्यक्रम राबवला जाईल. अभ्यासक्रम संपल्यावर उत्तर चाचणी घेऊन आकलन स्तर उंचावल्याची खात्री करून घेतली जाईल. त्यातही काही विद्यार्थ्यांचे आकलन पुरेसे झाले नसल्यास त्यांच्यासाठी पुन्हा विशेष बाब म्हणून अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.