कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा, उदय लळीत यांनी घेतली ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ | पुढारी

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा, उदय लळीत यांनी घेतली ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत यांनी आज शनिवारी कार्यभार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामुळे कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उदय लळीत यांचा कार्यकाळ 74 दिवस असणार आहे. ते 8 नोव्हेंबरला निवृत्त होतील.

तत्पूर्वी शुक्रवारी (दि.२६) मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निरोप देण्यात आला. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे रमणा यांनी आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये सांगितले.

सोळा महिन्यांच्या कार्यकाळामध्ये केवळ पन्नास दिवसच पूर्णकालीन आणि प्रभावीपणे काम करता आले, याबद्दल माफी मागतो, असे रमणा यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज प्रभावित झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला देखील आभासी मार्गानेच महत्वाच्या खटल्यांची सुनावणी होत होती. दरम्यान रमणा यांनी आज सुनावणी घेतलेल्या एका प्रकरणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. न्यायालयात सुनावणी सुरु असलेल्या एखाद्या खटल्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची ही पहिलीच वेळ होती, हे विशेष.

Back to top button