नागपुरात १४१ वर्षाचा इतिहास असलेल्‍या प्रसिद्ध मारबत उत्‍सवाला सुरूवात; काळी, पिवळी मारबत लक्षवेधी (व्हिडिओ)

मारबत उत्‍सव
मारबत उत्‍सव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील प्रसिद्ध मारबत उत्सवाला मोठ्या उत्साहात आज (शनिवार) सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हाव्यात आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या १४१ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

मात्र कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा उत्‍सव झालेला नव्हता. दरम्‍यान या वर्षी प्रसिद्ध बडग्या मारबत उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे. पोळा सणाच्या आठ दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते. दोन्ही मारबत स्थानापन्न झाल्यानंतर त्यांची पूजा करण्यासाठी पूजण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच आज काळी आणि पिवळी मारबत यांची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजले जाते, तर काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.

आज निघालेल्या या मिरवणुकी दरम्यान ईडा पिडा, रोग राई, जादू टोणा घेऊन जागे मारबत असे म्हणत समाजातील वाईट गोष्टींना संपविण्याचा प्रयत्न असतो. तसेच, राजकारणातील व समाजातील चुकीच्या लोकांचा, चुकीच्या मानसिकतेचा, विचारांचा विरोध देखील यावेळी केला जातो. या उत्‍सवात बडग्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त केला जातो.

या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. अखेरीस या मारबतीच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. या दहनाबरोबरच समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणूंचा नाश होतो व त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, अशी मान्यता आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news