file photo  
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : लाच घेतांना आदिवासी विकास महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

निलेश पोतदार

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा

येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक अजय किका पाडवी (वय ४० वर्ष) आणि चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे (वय ४७ वर्ष) यांना एका शेतकऱ्याकडून ५००० रुपयांची लाच स्विकारताना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

यातील मुळ तक्रारदार हे शेती व्यवसाय करतात. तक्रारदार यांची करणखेडा गाव शिवारात नंदुरबार रोडवर गट नं २७ व ११२ मध्ये ३० एकर शेत जमिन आहे. सदर शेती तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर आहे. सन २०२१ मध्ये दिवाळीच्या सुमारास निघालेली अंदाजे २०० क्विंटल ज्वारी त्यांच्या करणखेडा येथील त्यांच्या गोडावून मध्ये ठेवलेली आहे. सदर ज्वारी खराब असल्याचे सांगून तुझी ज्वारी तु विकू शकत नाही, असे नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक अजय किका पाडवी आणि चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांनी सांगितले.

तुला जर ज्वारी विकायची असेल तर प्रति क्विंटल २०० रूपये प्रमाणे द्यावे लागतील, अशी मागणी केली. तडजोडीअंती प्रती क्विंटल ५० रूपये लागतील अशी मागणी केली. ती ५००० रु लाचेची रक्कम आज दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी टोकरतलाव ता. जि. नंदुरबार येथील धान्य गोदामात स्विकारली. त्यावेळी पंचसाक्षीदारां समक्ष या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक, समाधान महादु वाघ, पोलिस हवालदार उत्तम महाजन, विजय ठाकरे, विलास पाटील, पोलिसनाईक अमोल मराठे, चिले, महाले या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम लाच मागत असतील, तर अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्श्न ऑफ ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT