पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, “पंजाबला बदनाम व अस्थिर केलं जातंय” | पुढारी

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबला बदनाम व अस्थिर केलं जातंय"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात पंजाबच्या काॅंग्रेस सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीसमोर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “या प्रकरणात पंजाबला बदनाम करण्याचं कारस्थान केलं जात आहे.”

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, “स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे सर्वात अधिक लोक हे पंजाबमधील होते. अशामध्ये पंजाब आणि पंजाब नागरिकांवर अशाप्रकार आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे. पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे, हा आरोप आधारहीन आहे. पंजाबला बदनाम आणि राज्याला अस्थिर करण्याच्या प्रयत्नातून हा सर्व प्रकार होत आहे.”

“जर पंतप्रधानांच्या दिशेने एखादी बंदुकीची गोळी येत असेल तर ती पहिल्यांदा माझ्या छातीवर येईल, या व्यतिरिक्त मी काय सांगू? आम्ही दहशतवादाला मोठ्या धैर्याने तोंड दिलं आहे. पंजाबने प्रत्येक अडचणीचा सामना केला आहे. याला अस्थिक करण्याचा प्रयत्न झाला. पण, पंजाब मोठ्या हिमतीने उभा राहिला आणि भविष्यातही उभा राहील. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं मत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलं.

“काही लोक रस्त्यावर आंदोलन करत होते, त्यांना माहितीदेखील नव्हतं की, या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. पंतप्रधानांच्या ताफ्याला एक किलोमीटर अंतरावरूनच आंदोलकांच्या हलचालींबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी यु-टर्न घेतला. अशा परिस्थितीत कुठे धोका दिसून येतो का?”, असा प्रश्नही पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी उपस्थित केला.

पहा व्हिडिओ : काठीच्या आधारे पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष

Back to top button