उत्तर महाराष्ट्र

महिला दिन विशेष : बायकांची भिशी’ पण पैशांची नव्हे वाचनाची..!

गणेश सोनवणे

नाशिक : अंजली राऊत

भिशी म्हटली की तिचे अनेक प्रकार आहेत. ऑफिसमधील बायकांची भिशी…..मैत्रिणींची भिशी….कुठे नातेवाइकांची भिशी….काही विशिष्ट महिलांच्या ग्रुपची भिशी तर.. काही 'व्हाॅट्सॲप' ग्रुपवरील भिशी…. काय काय आणि कुठे कुठे या भिशी सुरू असतात. पण आपण आजपर्यंत फक्त आणि फक्त पैशांची भिशी ऐकली असेल. मात्र, काही बायकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'वाचन भिशी'बद्दल फारसे कुणी ऐकले नसेल. पण हो, ही 'वाचन भिशी' नाशिकमध्ये सुरू असून, या माध्यमातून अलीकडे लोप पावत चाललेल्या वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे काम यातून होत आहे.

पुस्तकाचे आयुष्य हे पुस्तकाच्या नवीन कोऱ्या पानापासून तर ती पाने पिवळी आणि जीर्ण होईपर्यंत असते. मात्र, मोबाइल आणि इंटरनेटच्या जमान्यात याच पुस्तक वाचनाकडे कल कमी झालेला दिसून येतो. अशावेळी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी महिला मंडळाने 'पुस्तक वाचन भिशी' हा उपक्रम हाती घेतला. सुनीता पाठक यांच्या संकल्पनेतून नोव्हेंबर-2022 मध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पैशांचा विषयच नसून केवळ वाचनाची आवड, इच्छा आणि वेळ हवा आहे. या 'वाचन भिशी'मध्ये सुरुवातीला केवळ पाचच जणी सहभागी झाल्या. मात्र, हळूहळू या पाच जणींची संख्या आता 30 पर्यंत गेली आहे. त्यानुसार भिशीमधील प्रत्येक सखी ही एका पुस्तकाचा ध्यास घेऊन ते पुस्तक वाचून त्यातील सारांश येणार्‍या भिशी उपक्रमात सादर करत असते. त्या माध्यमातून दर महिन्याच्या तिसर्‍या शुक्रवारी सर्व महिला सभासद हे एका सभासदाच्या घरी जमून किंवा ठरलेल्या ठिकाणी एखादे वाचलेले पुस्तक व त्या संदर्भातील पुस्तकाची माहिती देऊन आपापले मत आणि अभिप्राय नोंदवतात. त्यातून मुक्तसंवाद साधतात. जेणेकरून इतर सभासदांनासुद्धा त्या पुस्तकातील माहितीची देवाण-घेवाण होते. तसेच त्याप्रमाणे समूहातील प्रत्येकाचे कौतुक केले जाते, त्यांना सांभाळून घेत एकीचे उदाहरण येथे मिळत आहे. त्याप्रमाणे आत्तापर्यंत अनेक पुस्तके वाचून झाली असून, त्यात आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि भागवताचे वाचनसुद्धा होत आहे. अवघ्या दीड ते दोन तास चालणाऱ्या या भिशीमध्ये पुस्तक वाचन होते, इतर गप्पांना येथे आवर्जून टाळले जाते. येणारी भिशी ही रामनवमीवर आधारित असून, त्यानुसार आधारित पात्रांवर विश्लेषण केले जाणार आहे. ग्रुपमध्ये असणाऱ्या बहुतांश महिलांकडे स्वत:ची लायब्ररी आहे. त्यातील पुस्तकांचे देवाणघेवाण केली जाते. एक साई महिला मंडळाची कुसुमाग्रज यांची ग्रंथपेटी असून, त्याद्वारेसुद्धा वाचन होते. भविष्यातही ही वाचन भिशी वृद्धिंगत व्हावी याकरिता सगळ्या जणी एकमेकींना आनंदाने मदत करत आहेत. या अभिनव उपक्रमासाठी ऋतुल कुमठेकर आणि सुनीता पाठक यांनी पुढाकार घेतला असून शैलजा ब्राह्मणकर, सुषमा अवलगावकर, भारती ठाकूर, ज्योती वरखेडे, हेमा मैंद, जया मेखे, अमिता हिंगे, उपासना माथूर, मीनल शिंदे, नीता सूर्यवंशी, सुवर्णा बच्छाव, विद्या कुलकर्णी आदी महिला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत.

बहुभाषिक महिलांचाही सहभाग

यामध्ये केवळ सुशिक्षित महिलांचाच सहभाग आहे असे नाही तर ज्या महिलेला वाचता येत नाही पण तिला आवड आहे, ती श्रोतुवर्ग म्हणूनसुद्धा आनंदाने सहभागी होऊ शकते. तसेच काही इतर भाषिकसुद्धा यामध्ये सहभागी होऊन मराठी भाषेचे कौतुकाने गोडवे गात आहेत. ग्रुपमध्ये सहभागी झाल्याने त्यांना मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि मराठी भाषा सहजपणे बोलता येते यावर विश्वास बसला आहे. इतर भाषिक महिलासुद्धा त्यांच्या भाषेतील साहित्य याठिकाणी शेअर करीत आहेत.

'ति'चे धाडस वाढले, भाषाशैलीही सुधारली

पूर्वी काहीही न बोलणाऱ्या महिलांमध्ये स्टेज डेअरिंग वाढली आहे. या महिलांचे धाडस वाढून भाषाशैली सुधारली आहे. त्या त्यांचे मत मांडू लागल्या आहेत. काही लेखिकासुद्धा भिशी ग्रुपमध्ये जॉइन झाल्या आहेत. काही जणी याद्वारे प्रेरित होऊन लिहित्या झाल्या आहेत. त्या स्वत:हून काही लेख तयार करत आहेत. या उपक्रमामुळे महिला कुटुंबातील दु:ख विसरून विरंगुळा अनुभव करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT