चाकण : वादळी वार्‍याने पोलिस चौकीवर कोसळले होर्डिंग | पुढारी

चाकण : वादळी वार्‍याने पोलिस चौकीवर कोसळले होर्डिंग

चाकण( ता. खेड ); पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी  गावाच्या हद्दीत वादळी वार्‍याच्या जोरामुळे एक महाकाय होर्डिंग महामार्गाच्या लगत असलेल्या चाकण वाहतूक शाखेच्या पोलिस चौकीवर कोसळले; मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. सोमवारी (दि. 6) सायंकाळपासून मंगळवारी (दि. 7) दिवसभर या संपूर्ण परिसरात सोसायट्याचा वारा वाहत होता. स्पायसर चौक ( कुरुळी ) येथे चाकण वाहतूक विभागाच्या चौकीच्या वरच असलेले मोठे जाहिरातीचे होर्डिंग सायंकाळी कोसळले.

होर्डिंग कोसळले त्या वेळी चौकीत कुणीही नव्हते; त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचे वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कुरुळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या होर्डिंगबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे कुठलीही नोंद नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी दिली आहे. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सायंकाळी उशिरा चौकीवर पडलेले हे होर्डिंग क्रेनच्या साह्याने बाजूला केले.

अनेक बेकायदा होर्डिंग
दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा व धोकादायक होर्डिंग उभे आहेत. त्यातील अनेक होर्डिंग जीर्ण झालेले असून, कधीही कोसळू शकतील, अशा स्थितीत आहेत. होर्डिंग कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे तातडीने सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पोलिस चौकीच्या वरच उभे असलेल्या होर्डिंगचे लोखंड गंजलेले असल्याने वादळी वार्‍याने हे होर्डिंग कोसळले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Back to top button