रत्नागिरी : नळ पाणी योजना देखभाल, दुरुस्तीची कामे महिला बचत गटांच्या हाती | पुढारी

रत्नागिरी : नळ पाणी योजना देखभाल, दुरुस्तीची कामे महिला बचत गटांच्या हाती

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : गावातील नळ पाणी योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत ठेकेदार नेमला जातो. यावर लाखो रुपये खर्च केला जातो. आता मात्र ही कामे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर 9 तालुक्यांत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर जिल्ह्यातील बचत गट आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये ‘हर घर नल से जल’ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त देशामध्ये स्वच्छ सुजल शक्ती सन्मान साजरा करण्यात येत आहे.

लांजा तालुक्यातील इंदवटी ग्रामपंचायतअंतर्गत महसूल गाव निवोशी येथे 6 मार्च रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर देण्याची घोषणा सरपंच विनोद गुरव यांनी विशेष ग्रामसभेमध्ये केली.

विशेषत: या महिला बचत गटाने स्वयंप्रेरणेने जबाबदारी स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र जीवनोन्नती (उमेद) यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या या बचत गटामध्ये एकूण 17 महिला कार्यरत आहेत. बचत गटाने योजनेची 100% पाणीपट्टी वसूल करणे, स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणे, नियमित टीसीएलची माहिती देणे, रासायनिक व जैविक तपासणी करणे, किरकोळ दुरुस्ती ही कुशल-अकुशल मनुष्यबळाकडून करून घेणे, यासारखी कामे करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, डीआरडी प्रकल्प संचालक घाणेकर, प्रकल्प संचालक राहूल देसाई व कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.

Back to top button