इगतपुरी/घोटी : पुढारी वृत्तसेवा : घोटीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील बुळे यांच्या श्रीरामवाडी येथील घरात घुसून तलवारीचा धाक दाखवून दोन अज्ञात दरोडेखोरांनी लूटमार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे घोटी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, श्रीरावाडीतील डॉ. सुनील बुळे हे रविवारी रात्री दोनच्या सुमारास इमर्जन्सी रुग्ण तपासण्यासाठी घराला बाहेरून कुलूप लावून हॉस्पिटलला गेले होते. यावेळी डॉ. सविता बुळे या घरात एकट्याच होत्या. या गोष्टीचा फायदा घेऊन दोन अज्ञात दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून डॉ. बुळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. डॉ. सविता बुळे यांना तलवारीचा धाक दाखवत सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, मणी-मंगळसूत्र व 38 हजार रुपये रोख असा सुमारे दीड लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश कासार, शीतल गायकवाड, धर्मराज पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आर. डी. मोताळे, पोलिस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार प्रवीण मासोळे, योगेश पाटील, सचिन पिंगळ आदी करीत आहे.