आई-वडिलांपेक्षा अधिक उंच का होतात मुलं? | पुढारी

आई-वडिलांपेक्षा अधिक उंच का होतात मुलं?

नवी दिल्ली : मुलांची उंची आई-वडिलांपेक्षा अधिक वाढल्याचे अनेक कुटुंबात सर्रास दिसून येत असते. असे का घडते याचा कधी विचार केला आहे का? संशोधकांनी हा विचार केला आणि त्याबाबत खास संशोधनही केले. आई-वडिलांच्या तुलनेत मुलं अधिक उंच होण्यामागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आई-वडील आणि मुलांमधील उंचीचा संबंध खरे तर त्यांच्या जीन्स म्हणजेच जनुकांशी असतो. मात्र, अन्यही अनेक घटक आहेत जे मुलांच्या उंचीवर परिणाम करीत असतात. त्यामध्ये जन्मदात्यांमधील पुरेशा पोषक घटकांचे अस्तित्व किंवा कमतरता. तसेच त्यांच्यामधील आजारांचा 20 टक्क्यांपर्यंत परिणाम मुलांच्या उंचीवरही पडत असतो. ऑस्ट्रेलियात झालेल्या एका संशोधनात आढळून आले की तेथील मुले वडिलांच्या उंचीपेक्षा एक टक्का अधिक उंच असतात.

तसेच मुलींची उंची आपल्या आईच्या उंचीपेक्षा तीन टक्के अधिक असते. नेदरलँडस्मध्ये हा आकडा दुप्पट आहे. तेथील मुलांची उंची वडिलांच्या उंचीच्या सुमारे दोन टक्के अधिक असते तर मुलींची उंची आईच्या उंचीपेक्षा सुमारे सहा टक्के अधिक असते. मुलींची उंची मुलांच्या तुलनेत अधिक वाढत असते. त्याचा थेट संबंध युवावस्थेत उत्सर्जित होणार्‍या हार्मोन्सशी आहे.

Back to top button