उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रूग्ण, शहरातील संशयितांचा आकडा दहावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मध्यंतरी स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या पूर्णपणे घटली होती. मात्र, शहरवासीयांना पुन्हा एकदा स्वाइन फ्लूला सामोरे जावे लागणार असून, वर्षाच्या सुरुवातीलाच सातपूर विभागात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला आहे. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती ठीक असून, जानेवारी महिन्यात एकूण दहा संशयित रुग्ण आढळल्याने मनपाचा आरोग्य-वैद्यकीय विभाग अलर्ट झाला आहे.

नाशिक शहरात सध्या कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. मात्र, बदलते वातावरण स्वाइन फ्लूच्या साथीला निमंत्रण देणारे ठरत आहे. शहरात स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला असून, सातपूरमधील ६७ वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेच्या स्वॅपचा नमुना पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविला होता. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. महिलेवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचे आणखी दहा संशयित रुग्ण असल्याने मनपाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या रुग्णांचे स्वॅपचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांना टॅमीफ्लूची औषधे देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत शहरात स्वाइन फ्लूच्या आजाराचे १४९ रुग्ण आढळले होते. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला होता. मनपा क्षेत्र बाह्य स्वाइन फ्लू रुग्णांचा आकडा ८५ इतका होता. त्यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला.

शहरात १,६७६ तापाचे रुग्ण

वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे तापसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मनपाच्या रुग्णालयांमध्ये तापसदृश आजाराच्या एकूण १६७६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांतील तापसदृश रुग्णांची माहिती नसल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणावर असू शकतो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT