पुणे : ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त; याच आठवड्यात शाळा नोंदणीला होणार प्रारंभ | पुढारी

पुणे : ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त; याच आठवड्यात शाळा नोंदणीला होणार प्रारंभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी याच आठवड्यात शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

आरटीई प्रवेशासाठी गेल्यावर्षी 23 फेब—ुवारीला वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यंदा मात्र संबंधित वेळापत्रकाबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे वेळापत्रक नेमके कधी जाहीर होणार, असा प्रश्न पालक उपस्थित
करत आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्यांदा ‘ऑटो फॉरवर्ड’ केलेल्या शाळांची आणि नवीन नोंदणी झालेल्या शाळांची पडताळणी करण्यात येते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, यंदा वेळापत्रकच जाहीर झाले नसल्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीमुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘एनआयसी’कडून वेबसाईटची टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच आठवड्यात शाळा नोंदणीचे काम सुरू केले जाणार आहे. शाळांची नोंदणी झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येईल. यंदाची आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

                                 – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

Back to top button