उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर हातोडा पडणार ; प्रशासन-पुरोहितांमध्ये वादाची चिन्हे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : रामकुंडावरील वस्त्रांतरगृह मागील सिंहस्थात पाडण्यात येणार होते. परंतु, त्यास झालेला विरोध आणि वेळेचा विचार करता त्यावेळी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, आता रामकुंडावरील अडथळे आणि काँक्रिटीकरण काढले जात असल्याने वस्त्रांतरगृह काढण्याच्या विषयाने पुन्हा डोके वर काढले असून, तसा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. त्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती त्याबाबत निर्णय घेणार आहे.

यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष आनंद लिमये यांनी तशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या असून, वस्त्रांतरगृह पाडण्यावरून प्रशासन आणि पुरोहित यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत. स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाची 22 वी सभा शनिवारी (दि.26) आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रोजेक्ट गोदाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. या कामांविषयी संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोदापात्रातील काँक्रीट काढणे तसेच रामसेतू पूल पाडण्यावरून संचालकांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. वाद सुरू असतानाच आता वस्त्रांतरगृह पाडण्याचा प्रस्ताव कंपनीने बैठकीत सादर केला. 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी वस्त्रांतरगृह पाडण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु, पुरोहित संघाने त्यास विरोध केल्याने प्रस्ताव बारगळला.

मात्र आता या वस्त्रांतरगृहाची खरोखरच आवश्यकता आहे का आणि त्याचा वापर भाविकांसाठीच होतो का हे तपासणे गरजेचे असल्याचे संचालकांनी बैठकीत सांगितले. वस्त्रांतरगृह हटवून ते रामकुंड परिसरात असलेल्या सुलभ शौचालयावर किंवा त्याशेजारी बांधण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मात्र, होणारा विरोध आणि त्याची गरज याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल संचालक मंडळाला सादर करावा, असे आदेश लिमये यांनी दिले.

वस्त्रांतरगृह पुरोहितांच्याच ताब्यात
भाविकांसाठी महापालिकेतर्फे 1992 मध्ये वस्त्रांतरगृहाची इमारत साकारण्यात आली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भाविकांऐवजी केवळ पुरोहितच त्याचा वापर करत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी काही पुरोहितांनी तर स्वत:ची कार्यालये थाटली आहेत. भाविकांना या ठिकाणी प्रवेशही दिला जात नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी वस्त्रांतरगृह पाडण्याची सूचना केली होती.

वस्त्रांतरगृह पाडण्याबाबत पुरोहित संघाने प्रस्ताव दिलेला नाही. तसेच स्मार्ट सिटी कंपनीचा असा प्रस्ताव असल्यास त्याला आमचा विरोध असेल.– सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

भाविकांसाठी साकारण्यात आलेल्या वस्त्रांतरगृहाचा वापर खरोखरच भाविकांसाठी होतोय का हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या त्याचा वापर आणि लोकांच्या भावना याबाबत विचार होणे गरजेचे आहे.
– शाहू खैरे,
संचालक, स्मार्ट सिटी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT