नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील अभोणा येथे सिडको, कृष्णानगर परिसरात सात ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सात ही घरफोड्या एकाच रात्री झाल्याने परिसरात खळबळ पसरली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी (दि. ६) मध्यरात्री तीनच्या सुमारास सिडको भागातील पूर्वेकडील भागास नाल्याला लागून असलेल्या एकनाथ कुवर यांच्या मालकीच्या चार कुलूपबंद खोल्या, एन. के. पगार या शिक्षकांचे राहते घर, त्यांच्या शेजारी व्ही. टी. वाघ यांचे राहते घर, भाग्यश्री गणेश अहिरे यांच्या कुलूपबंद घराचा कडीकोयंडा गॅसकटरने तोडून धाडसी चोरीचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला.
जिभाऊ बागूल यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये १२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १३ हजार १९० रुपये किमतीची कर्णफुले असा एकूण २५ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची नोंद अभोणा पोलिस ठाण्याअंतर्गत करण्यात आली आहे. याशिवाय एन. के. पगार यांच्या घरातून पैसे आणि एटीएम कार्ड असलेले पाकीट, वाघ यांच्या घरातील किमती ऐवज, भाग्यश्री अहिरे यांच्या घरातील चांदीचे पैंजण आदी मुद्देमाल चोरांनी लंपास केला. पगार यांच्या घराजवळून उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार दरोडेखोर घरांची पाहणी करताना दिसून आले आहेत. अभोणा सिडको परिसरातील नोकरदार वर्ग सुटीनिमित्त गावाकडे गेल्यानंतर दरवर्षी असे घरफोडीचे प्रकार घडत असून, या चोरीमुळे अभोणा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.