ग्राम पंचायतीचा निधी कसा खर्च करावा याची माहिती एका तरुणाने मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या वेबसाईटवरून घेतली. ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यावरून पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील तरुणाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दाेघे जण जखमी झाले आहेत.
पाचोरा तालुक्यातील एका तरुणाने ग्राम पंचायतीचा निधी खर्च करण्याबाबत मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या वेबसाईटवरून वरसाडे तांडा नंबर १ या विविध योजनांमधून आलेला ग्राम पंचायतीचा निधी याबाबत माहिती घेतली. ती माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वरसाडे तांडाच्या ग्रुपवर टाकली.
या माहिती बरोबर आता तरी विकास कामे होऊन गाव प्रगतीपथावर येऊ द्या; असा हेतू डोळ्यासमोर ठेवून कामांना सुरुवात करा. निधीचा योग्य वापर करा, असे आवाहन केले होते.
या व्हायरल पोस्टमुळे सत्ताधारी सरपंच लीलाबाई शिवदास राठोड आणि त्यांचे पती शिवदास भुरा राठोड यांचा गैरसमज झाला. या गैरसमजातून रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान त्यांनी ४० ते ५० समर्थकांना सोबत घेत थेट विजयसिंह धर्मा राठोड यांच्या घरावर हल्ला केला.
रामकृष्ण राठोड यांच्या मालकीचे ॲक्वा फिल्टर प्लांटवर हल्ला चढवून प्लांटची तोडफोड केली. तसेच घरात घुसून रामकृष्ण विजयसिंग राठोड व यांची पत्नी आशाबाई राठोड व घरातील इतर सदस्यांना बेदम मारहाण केली. यात रामकृष्ण विजयसिंग राठोड व आशाबाई राठोड जखमी झाले.
याचबरोबर आशाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी तसेच इतर किंमती वस्तू गहाळ झाल्या आहेत.
त्यांनी कसातरी पळ काढून जीव वाचवत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली.