उत्तर महाराष्ट्र

समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग

अंजली राऊत

नाशिक  : संध्या गरवारे-खंडारे

कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळणवळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. राज्याच्या विकासात रस्ते विकासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 11) 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख….

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. या महामार्गामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.

घोषणा ते पूर्तता…
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर – मुंबई शीघ—संचार द्रुतगती महामार्ग तयार करणार, अशी घोषणा केली होती. यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे. या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण झाली असून, 114 कामे प्रगतिपथावर आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादन हे एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. प्रवाशांच्या आरामासाठी महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे उभारली आहेत.

हरित महामार्ग…
परिसरातील वन्यजिवांना हानी पोहोचू नये, यासाठी 100 वन्यजीव मार्ग तयार केले आहेत. तसेच 1000 हून अधिक कृत्रिम शेततळ्यांची निर्मिती करताना रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक झुडुपे व वेलींच्या रोपणाचे नियोजन आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल. महामार्गावर 15 वाहतूक साहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसाद वाहने आणि लाइफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. महामार्गालगत 138.47 मेगावॉट सौरऊर्जा तयार केली जाईल. तसेच 18 ठिकाणी नवीन शहरे उभारली जाणार असून, त्याद्वारे पाच लाख रोजगारनिर्मिती होईल.

पर्यटनाला चालना…
समृद्धी महामार्ग शिर्डी, वेरूळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक व इगतपुरी इत्यादी विविध पर्यटन स्थळांना जोडले जाणार असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस – वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारे मालाची जलद वाहतूक सुलभ होईल. बदलत्या काळात महाराष्ट्राला वेगवान प्रगतीसाठी 'समृद्धी महामार्ग' मोलाची कामगिरी बजावेल. शासनाने उचललेले हे पाऊल आश्वासक असून, समृद्धी विकासाचा मार्ग ठरेल. महामार्गालगत राहणार्‍या जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडून येईल, हे मात्र नक्की!

(लेखिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहायक संचालक आहेत)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT