नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका | पुढारी

नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सव्वा लाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आ. सुहास कांदे यांच्यामार्फत योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ईगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याच्या आ. कांदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

316 कोटींच्या योजनेसोबत 235 कोटींच्या नांदगाव मतदारसंघातील 78 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचीदेखील वर्कऑर्डर यावेळी देण्यात आली. वर्कऑर्डरनुसार लवकरच कामाचा प्रारंभ केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात सर्वांत जास्त दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, मुबलक जमीन, वीज आदी गोष्टी मुबलक प्रमाणात असताना केवळ भीषण पाणीटंचाईमुळे शहर विकासपासून दूर आहे. वर्षभर नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र गेल्या 35 ते 40 वर्षांपासून दिसत आहे. त्याचप्रमाणे इतर शहरांचा झपाट्याने विकास झालेला असताना मनमाडचा मात्र विकास होण्याऐवजी शहर भकास होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. पाण्याच्या अभावी औद्योगिक वसाहत, कारखाने, उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांच्या हाताला कामधंदा नाही. या पार्श्वभूमीवर आ. कांदे यांनी मुळावर घाव घालण्याचा निर्धार करत करंजवण योजनेसाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, योजनेच्या कामाची वर्कऑर्डर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठेकेदाराला देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, संग्राम बच्छाव, महेंद्र दुकळे, राजाभाऊ भाबड, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, पंकज निकम, शहरप्रमुख मयूर बोरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहरप्रमुख जयकुमार फुलवानी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, सुरेश शेलार, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे, महावीर ललवाणी, भरत पवार आबा देवरे, नारायण पवार, एकनाथ बोडके, महेश बोराडे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने मनमाडसह नांदगाव मतदारसंघासाठी तब्बल 551 कोटींच्या पाणीपुरवठा मंजूर करून त्यासाठीच्या निधीची तरतूदही केली आहे. त्यासाठी सर्व मंत्री,अधिकार्‍यांचा ऋणी असून लवकरच योजना मार्गी लागेल. – आ. सुहास कांदे, नांदगाव.

हेही वाचा:

Back to top button